करोना विषाणूचं साम्राज्य सध्या संपूर्ण जगावर पसरल्याचं दिसून येतं आहे. ९० पेक्षा अधिक देशांमध्ये या विषाणूने हातपाय पसरले आहेत. त्यामुळे हजारो लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेत असून नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळत आहे. यामध्येच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी त्यांच्या प्रकृतीची सध्या कशी आहे हे सांगितलं आहे. सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ऑडिओ मेसेज पाठवून दोघांच्याही प्रकृतीची माहिती दिली आहे.
‘ज्यांनी ज्यांनी फोन, मेसेज, व्हॉट्सअँप मेसेजच्या माध्यमातून आमच्या प्रकृतीची चौकशी केली. त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आम्ही दोघंही ठीक आहोत. आमची प्रकृती ठीक आहे. सध्या आम्ही साऱ्यांपासून लांब आहोत. आम्ही शक्यतो कोणालाच भेटत नाहीये आणि दोघांच्याही प्रकृतीची विशेष काळजी घेत आहोत’, असं सायरा बानो यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Dilip Kumar Saira Banu #CoronavirusLockdown #StayHomeSaveLives pic.twitter.com/uM4u3SeX9U
— Dilip Kumar (@TheDilipKumar) March 26, 2020
दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दिलीप कुमार यांना करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी दिलीप कुमार यांनी दिलीप कुमार यांनी “करोना विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी मला विलगीकरण कक्षात ठेवले आहे. सायरा बानो माझी पूर्ण काळजी घेत आहेत.” असं ट्विट करुन त्यांनी ही माहिती चाहत्यांना दिली होती.