बॉलिवूडच्या स्टार्सपेक्षा एका उत्तम अभिनेत्याला प्रेक्षक आज पसंती देत आहेत. त्याच काही उत्तम अभिनेत्यांपैकी एक म्हणजे गजराज राव. नुकत्याच आलेल्या ‘बधाई हो’ किंवा ‘शुभमंगल ज्यादा सावधान’सारख्या चित्रपटातून गजराज यांना उत्तम भूमिका मिळाल्या पण त्याआधी त्यांना म्हणव्या तशा भूमिका मिळाल्या नव्हत्या. १९८४ साली आलेल्या ‘बँडीट क्वीन’मधून गजराज यांना ओळख मिळायला सुरुवात झाली.

त्याआधी गजराज यांनी वेगवेगळी कामं केल्याचं एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. टेलरींगच्या कामापासून स्टेशनरीच्या दुकानापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलं आहे. इतकंच नाही तंर १९८९ च्या दरम्यान गजराज हे हिंदुस्तान टाइम्ससाठी लिहायचेदेखील. त्याकाळी त्यांनी महमुद, उत्पल दत्त, यश चोप्रा यांच्यासारख्या दिग्गज लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी या त्यांच्या खडतर काळाविषयी आणखी खुलासा केला.

आणखी वाचा : प्रसिद्ध अभिनेत्याने पितृपक्षात केले श्राद्ध, म्हणाला “वर्षातून एकदा आपल्या पूर्वजांसाठी…”

गजराज म्हणाले, “मी आयुष्यात टक्के टोणपे खूप खाल्ले आहेत. घरची आर्थिक परिस्थिति बिकट होती. त्यामुळे मला काम करणं भाग होतं आणि या कामातून मला खूप शिकायला मिळालं. आयुष्य बऱ्यापैकी खडतर होतं पण मनात एक जिद्द होती, आणि आपल्या कुटुंबाला सुखी ठेवावं ही इच्छा होती.”

कामाच्या निमित्ताने गजराज राव हे मुंबईमध्ये येत असत. अभिनयाच्या कारकिर्दीला चालना मिळण्याअगोदरचा एक किस्सा त्यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितला. गजराज म्हणाले, “मुंबईत स्थायिक होण्याआधी मी इथे येऊन पहिले काम शोधू लागलो. मी माझ्या मित्राच्या घरी रहात होतो आणि एक स्क्रिप्ट लिहीत होतो. आणि मी लिहिलेली कथा ऐकवण्यासाठी अंधेरीपासून वरळीपर्यंत मी प्रवास करून गेलो पण दिग्दर्शकाने माझी कथा नाकारली. त्यावेळेस माझ्याकडचे सगळे पैसे संपले होते. जेमतेम ५ ते ६ रुपये माझ्या खिशात उरले होते. माझी कथा दिग्दर्शकाला आवडेल आणि आजच तो मला थोडी रक्कम देईल अशी मला खात्री होती, पण तसं काहीच झालं नाही आणि त्याक्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या उरलेल्या पैशात मी काहीतरी खाऊ की लोकल ट्रेन पकडून पुन्हा घरी जाऊ या कात्रीत मी सापडलो होतो.”

गजराज राव हे सध्या सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘रे’, ‘लूटकेस’सारख्या चित्रपटात त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. गजराज राव आता ‘मजा मा’ या चित्रपटात धकधक गर्ल माधुरी दीक्षितबरोबर दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये त्यांची माधुरीबरोबरची केमिस्ट्री लोकांना चांगलीच पसंत पडली आहे.

Story img Loader