तुम्ही कधी शाळेत मोकळ्या वेळी कंपासपेटीवर पेन आणि पट्टीने वाजवत धांगडधिंगा केलाय का? जर तुमचं उत्तर हो… असेल तर मग हे गाणं पाहून तुमच्या शालेय जीवनातील आठवणीही जाग्या होतील. अभिनेता इरफान खानच्या आगामी ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटातील ‘एक जिंदरी’ हे गाणं सध्या अनेकांना पुन्हा एकदा ‘त्या’ खट्याळ दिवसांचा फेरफटका मारुन आणत आहे. ‘सूरज जैसे चमकेंगे…’ अशा ओळीने सुरुवात होणारे हे गाणे पंजाबी भाषेतील ‘एक जिंदरी’ शाळेतील आठवणी ताज्या करत आहे.

सचिन-जिगर या जोडीने संगीतबद्ध केलेलं हे गाणं तनिष्का संघवीने गायलं आहे. गीतकार कुमारचे शब्द असलेलं हे गाणं आणि त्यात बऱ्याच लहान मुलांचे आवाज ऐकून बऱ्याच गोष्टी नजरेसमोरून जातात. मुख्य म्हणजे हे गाणे पाहताना त्यातून एक चांगला संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा सुरेख प्रयत्न केल्याचं लक्षात येतय. कोणत्याही शाळेचा स्तर पाहण्यापेक्षा त्या ठिकाणी दिली जाणारी शिकवण, एकंदर वातावरण आणि विद्यार्थ्यांना दिली जाणारी वागणूक सर्वात महत्त्वाची असते ही बाब ‘एक जिंदरी’तून अधोरेखित करण्यात आली आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर आणि अभिनेता इरफान खान यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटाचा ट्रेलरही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आपल्या मुलीला मोठ्या इंग्रजी माध्यमिक शाळेत दाखला मिळावा यासाठी संघर्ष करणाऱ्या जोडप्याची भूमिका इरफान आणि सबा या चित्रपटात साकारत आहेत. तेव्हा आता इरफान- सबा त्यांच्या या प्रयत्नांमध्ये यशस्वी होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader