गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलीस दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराजमधील कॉल्विन वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात होते. महाविद्यालयाच्या बाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून अतिक आणि अशरफची हत्या केली. या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर. खानने ट्विटरवरून त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. परंतु त्या प्रतिक्रियेनंतर तो ट्रोल होऊ लागला. त्यामुळे आज त्याने याप्रकरणी आणखी एक ट्वीट करून सांगितलं की, तो अतिक अहमदचं समर्थन करत नाही.
अतिक आणि अशरफच्या हत्येनंतर कमाल आर. खानने ट्विटरवर त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यामध्ये त्याने म्हटलं होतं की, पहिल्या दिवसापासून अतिक सर्वोच्च न्यायालयात सांगत होता की, उत्तर प्रदेशमध्ये त्याची हत्या केली जाऊ शकते. त्याचवेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला अतिकला सुरक्षा प्रदान करण्याबाबत आश्वस्त केलं होतं. आता या हत्येनंतर सर्वोच्च न्यायालय काय पावलं उचलतं हे पाहावं लागेल. सर्वोच्च न्यायालय आता स्वतःचं महत्त्व कसं कायम राखेल?
या ट्वीटनंतर कमाल आर. खान ट्रोल होऊ लागला. अनेकांनी त्याला अतिक अहमदचा समर्थक ठरवलं होतं. त्यामुळे कमालने आज पुन्हा एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये कमाल खानने म्हटलं आहे की, “मी अतीक अहमद आणि अशरफ अहमद यांचं समर्थन करत नाही, एका सेकंदासाठीही मी त्यांचं समर्थन केलं नाही. त्यांच्यासोबत जे काही घडलं ते त्यांचे कर्म आहे. मी कोणत्याही गुन्हेगाराचं समर्थन करत नाही, तो कोणीही असो. पण मी पुन्हा सांगतो, कोणीही कायदा हातात घेऊ नये. न्यायव्यवस्थेला त्यांचं काम करू द्या.”
हे ही वाचा >> अतिक अहमदनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातही लढवली होती निवडणूक; मिळालेली ‘इतकी’ मतं!
अतिकच्या हत्येनंतर कमाल खानने वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ट्वीट केलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टाला प्रश्न विचारणारं ट्वीटही त्याने केलं होतं. त्यामुळेच अनेक ट्विटर युजर्स कमालला ट्रोल करू लागले होते. म्हणूनच आज कमालने नवीन ट्वीट करून स्पष्टीकरण दिलं.