बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty ) यांचे नाव आदराने घेतलं जातं. उत्तम अभिनयाबरोबरच त्यांच्या नृत्य कौशल्याने देखील प्रेक्षकांना वेड लावलं. बॉलिवूडचे डिस्को डान्सर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. बॉलिवूडचे बरेच सुपरहिट चित्रपट मिथुन यांच्या नावे आहेत. पण त्यांच्यासाठी इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे.
आणखी वाचा – रणबीर कपूरची जादू फिकी, अवाढव्य खर्च, जबरदस्त प्रमोशन करूनही ‘शमशेरा’ला थंड प्रतिसाद
मिथुन सध्या ‘प्रजापति’ (Projapoti) या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाच्यानिमित्ताने त्यांनी ईटाइम्सशी संवाद साधला. यावेळी त्यांना तुमच्या करिअरमधील सगळ्यात कठीण प्रसंग कोणता होता? तुम्ही त्याचा कसा सामना केला? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मिथुन यांनी आपल्या करिअरमधील सगळ्यात कठीण प्रसंगाबाबत भाष्य केलं.
ते म्हणाले, “मी माझ्या करिअरमधील कठीण प्रसंगांबाबत जास्त बोलत नाही. किंवा विशेष असं काही घडलंच नाही जे मी सगळ्यांना सांगू शकेन. ते संघर्षाचे दिवस आणि त्याबाबत बोलणं आपण टाळूया. कारण यामुळे नवोदित कलाकार निराश होतील. प्रत्येकाला मेहनत ही करावीच लागते. पण मला इतरांपेक्षा अधिक मेहनत करावी लागली.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “बऱ्याचदा मला असं वाटायचं की मी माझं ध्येय गाठू शकणार नाही. इतकंच नव्हे तर मी आत्महत्या करण्याचा विचार देखील केला होता. काही कारणास्तव कोलकातामध्ये पुन्हा जाणं मला शक्य नव्हतं. न लढताच आयुष्य संपवण्याचा विचार कधीच करू नका हा मी सल्ला आवश्य देईन. हार मानायची नाही हे एकच मला माहित होतं आणि आज पाहा मी कुठे आहे.” मिथुन यांनी आजवर जवळपास ३५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचा हा संपूर्ण प्रवास खरंच प्रेरणादायी आहे.