‘मिर्झापुर’सारख्या वेबसीरिज आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’सारख्या चित्रपटातून पुढे आलेले पंकज त्रिपाठी हे सध्या बॉलिवूडमधलं मोठं आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहे. २ दशकांहून अधिक काळ पंकज मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत आणि प्रेक्षकांनी त्यांना आणि त्यांच्या कमाला चांगलीच पसंती दर्शवली आहे. सध्या एकूणच मनोरंजनसृष्टी बद्दल निर्माण झालेली उदासीनता आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर न चालणे याबद्दल पंकज यांनी त्यांचं मत मांडलं आहे.

सध्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे चित्रपट आणि मूळ प्रवाहातले व्यवसायिक चित्रपट याविषयी कनेक्ट एफएम कॅनडा या माध्यामशी बोलताना पंकज म्हणाले, “या परिस्थितिमागचं ठोस असं कारण सांगता येणं कठीण आहे. माझ्याच १५ वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर माझ्याही आवडीमध्ये फरक पडला आहे. मी मल्याळम तसेच बंगाली चित्रपट पाहतो, पण मुख्य प्रवाहातले व्यावसायिक चित्रपट अगदी मोजकेच बघतो. कोविड काळानंतर ओटीटीमुळे प्रेक्षकांची आवड बऱ्यापैकी बदलली आहे.”

आणखी वाचा : ‘विक्रम वेधा’च्या कलाकारांनी लावली कपिल शर्मा शोमध्ये हजेरी; सैफ म्हणाला “मी चांगला नागरिक…”

दाक्षिणात्य चित्रपट आणि त्यांच्या कमाईबद्दल बोलताना पंकज म्हणाले, “लोक साऊथचे चित्रपट चालतात असा गवगवा करत आहेत. पण प्रत्यक्षात मोजून ३ किंवा ४ चित्रपटच सुपरहीट ठरले आहेत. पण हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यापद्धतीने व्यावसायिक गणितं मांडून चित्रपट बनवले जातात त्यांच्या लिखणाबद्दल, कथेबद्दल मला नेहमीच चिंता वाटते.”

याबरोबरच चित्रपटसृष्टीला चांगल्या लेखकांची गरज आहे असंही पंकज यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं. नुकतीच पंकज यांची क्रिमिनल जस्टीस ही वेबसीरिज हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे आणि लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. पंकज आता ‘ओह माय गॉड २’मध्ये अक्षय कुमारबरोबर झळकणार आहेत. शिवाय लोकप्रिय ‘मिर्झापुर सीझन ३’ चं चित्रीकरणही त्यांनी सुरू केलं आहे.

Story img Loader