अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. ट्वीट करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही भाष्य करत असतात. अलीकडेच त्यांनी ट्विटरवर वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषेतील पंतप्रधान मोदींचे फोटो शेअर करून खिल्ली उडवली आहे. या ट्वीटमध्ये काही युजर्सनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
अती कपडे परिधान करणे ही नग्नत्व झाकण्याची नवीन पद्धत (आहे का?) अशा अर्थाचं ट्वीट त्यांनी केलं आहे. या कॅप्शनबरोबर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वेगवेगळ्या पेहरावातील २० फोटो दिसून येत आहेत. यापैकी अनेक फोटोंमध्ये मोदींनी डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या घातलेल्या आहेत किंवा वस्त्रं गुंडाळलेली आहेत. याच फोटोचा संदर्भ देत आपलं नागवेपण झाकण्यासाठी अशापद्धतीने नटून थटून मिरवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न प्रकाश राज यांनी विचारला आहे. या ठिकाणी ‘न्यूडीटी’ हा शब्द अपयश झाकणे या अर्थाने वापरण्यात आला आहे. “ओव्हर ड्रेसिंग ही नवीन नग्नता आहे,” असं कॅप्शन प्रकाश राज यांनी दिलंय. फोटो शेअर करताना कॅप्शनसाठी प्रकाश राज यांनी वापरलेल्या शब्दांवरून अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर यूजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘काहीही बोलताय तुम्ही’, असं एका युजरने म्हटलंय. तर, काही युजर्सनी प्रकाश राज यांच्या चित्रपटातील सीनमधील फोटो शेअर करत त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय.
प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात ते काँग्रेसच्या राजवटीत युरियाचा प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन झाल्याचा आरोप करत होते. तसेच भाजपा सरकाने त्यावर अंकुश आणल्याचं म्हटलं होतं. त्या व्हिडीओला कॅप्शन देत प्रकाश राज यांनी लिहिलं होतं की, “आता सगळीकडे भ्रष्टाचार आहे. ४०%…३०%..२०% प्रमाणे.”
पंतप्रधान मोदींबद्दल ट्विट केल्याने प्रकाश राज यांना नेहमीच ट्रोल केलं जातं. पण ते कायमच आपलं मत मांडत असतात. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.