अभिनेता राहुल देव सध्या त्याचा आगामी कन्नड चित्रपट ‘कब्जा’मुळे चर्चेत आहे. त्याने बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येही उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. आपल्या भूमिकांमुळे राहुल नेहमीच चर्चेत राहिला. आपल्या कामामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या राहुलचं खासगी आयुष्य सध्या चर्चेत आलं आहे. आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलणं तो नेहमी टाळतो. पण आता एका मुलाखतीदरम्यान राहुलने आपलं दुःख बोलून दाखवलं आहे.

राहुलने रिना देवशी १९९८मध्ये लग्न केलं. पण लग्नाच्या काही वर्षानंतरच म्हणजेच २००९मध्ये रिना यांचं निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर राहुलला एकटेपणा जाणवू लागला. त्यानंतर त्याने एकट्यानेच आपल्या मुलाचा सांभाळ केला. कनेक्ट एफएम कनाडाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने याबाबात भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Video : रस्त्यालगतच्या दुकानामध्येच काम करू लागला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, नेटकरी म्हणाले, “माणूसकी जपली अन्…”

तो म्हणाला, “मुलांचा सांभाळ करणं सोपे काम नाही. मुलांचं संगोपन करण्यामध्ये महिलांचा खूप मोठा वाटा असतो. एक आई ज्याप्रकारे आपल्या मुलाची समजूत काढते त्यासारखं दुसरं कोणीच करू शकत नाही. स्त्रिया आपल्या मुलांबरोबर फार समजूतीने वागतात. मीदेखील तसंच वागण्याचा प्रयत्न करतो. पण बऱ्याचदा माझ्याकडून ते शक्य होत नाही. आई आणि वडील या दोन्ही जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत.”

“माझ्याबरोबर माझी पत्नी नाही याचा मला खूप त्रास होतो. म्हणूनच याबाबत बोलणं आणि आठवणींमध्ये रमणं मी बऱ्याचदा टाळतो. एका व्यक्तीबरोबर त्याचा जोडीदार नाही हे चित्र बऱ्याचदा चित्रपटामध्ये दाखवण्यात येतं. पण नव्याने आयुष्याची सुरुवात करणं फार कठीण असतं.” असंही राहुल म्हणाला. राहुलने पत्नीच्या निधनानंतर अभिनेत्री मुग्धा गोडसेला डेट केलं. या दोघांचं नातं जगजाहिर आहे. तसेच आपल्या मुलापासूनही त्याने मुग्धाबरोबरचं नातं लपवलं नाही.