‘धकधक गर्ल’ म्हणा किंवा नुसत्या स्मितहास्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी सौंदर्यवती म्हणा. कितीही विशेषणं वापरली तरही अनेकांच्याच डोळ्यांसमोर निर्विवादपणे एकच चेहरा उभा राहतो तो म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेचा. हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय आणि अदांनी प्रेक्षकांना गारद करणारी माधुरी सध्या तिच्या मराठी चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटातून माधुरी मराठी कलाविश्वात पदार्पण करतेय. तिच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एक नाव या ‘बकेट लिस्ट’मधून झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील त्या सुपरस्टारचं नाव आहे रणबीर कपूर. बसला ना तुम्हालाही धक्का? स्वत:ला माधुरीचा सर्वात मोठा चाहता म्हणवणाऱ्या रणबीरला पुन्हा एकदा तिच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. याआधी ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील एका गाण्यासाठी ते दोघं रुपेरी पडद्यावर एकत्र झळकले होते. त्यानंतर आता थेट ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातून रणबीर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

रणबीरशी संलग्न सूत्रांनी याविषयी माहिती दिली. या चित्रपटात रणबीर कोणत्या भूमिकेत आणि किती वेळासाठी दिसणार आहे, याविषयी अद्यापही कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. त्याशिवाय माधुरी किंवा चित्रपटाशी निगडीत कोणत्याच व्यक्तीने याविषयीची अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे आता सर्वांचच लक्ष या चित्रपटाविषयीच्या अधिकृत घोषणेकडे लागलं आहे. ‘बकेट लिस्ट’ हा जरी मराठी चित्रपट असला तरीही त्याच्याशी हिंदी कलाविश्वातील बरीच नावं जोडली जात आहेत. ज्यामध्ये निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेचाही समावेश आहे. तेजस देओस्कर दिग्दर्शित हा चित्रपट २५ मे ला प्रदर्शित होणार असून आता प्रेक्षकांची बकेट लिस्ट पूर्ण करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader