गजब तमाशा च्या निमित्ताने रणजीतने जुहूच्या आपल्या प्रशस्त बंगल्यावर आयोजित केलेल्या पार्टीत तो मस्त रंगात आला असता त्याला सहज विचारले, नायिकांवर जबरदस्ती करण्याच्या तुझ्या खासियतेमध्ये तुझा आवडता चित्रपट कोणता? यावर तो पटकन म्हणाला, शोले… त्यावर म्हणालो, त्यात तर तू नव्हतास… यावर गप्प बसेल तो रणजीत कसला? त्यात मी नव्हतो म्हणूनच ‘बसंती’वर जबरदस्ती झाली नाही. असे म्हणतच तो जोरात हसत सुटला. रणजीतने सत्तरच्या दशकात जवळपास आपल्या प्रत्येक चित्रपटामध्ये खलनायकी भूमिका साकारल्या. कालांतराने त्याला तशा भूमिका मिळणे कमी झाले.
रणजीतने नवीन निश्चल आणि रेखा यांच्याबरोबरीने ‘सावन भादो’द्वारे रुपेरी प्रवास सुरू केला आणि खलनायक म्हणून नाव कमावले. तरी तो ‘बॉस’ झाला नाही. त्यामुळे त्याचे काही आडले नाही. मोठ्या पडद्यावरील त्याच्या स्त्रीलंपट प्रतिमेचा कालांतराने एका जाहिरातीतही सदुपयोग झाला. यापलिकडे जाऊन रणजीत आहे. विनोद खन्ना, फराह, किमी काटकर, अमरीश पुरी याना घेऊन त्याने ‘कारनामा’ नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्या चित्रपटात त्याने सामाजिक कथानक मांडून आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर राहुल रॉय-अनु अगरवाल जोडीच्या ‘गजब तमाशा’ची निर्मिती केली. दोन्हीत आलेल्या अपयशानंतर पुन्हा त्या वाटेला गेला नाही. फिल्मी पार्ट्यांतून तो दिसे. काही मालिकांतून त्याने भूमिका करताना त्याच्या भेटीचे योग आले. माणूस एकदम गप्पीष्ट. बोलता-बोलता सहजपतेने जुन्या गोष्टी सांगणार. एकदा तर पौराणिक चित्रपटातून भूमिका साकारत खूप मोठा आश्चर्याचा धक्का दिला. रणजीत सभ्य बनतो तेव्हाच तो मोठा धक्का देतो, हेच खरे.
फ्लॅशबॅक: रणजीत जेव्हा सभ्य बनतो…
रणजीत सभ्य बनतो तेव्हाच तो मोठा धक्का देतो...
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 06-05-2016 at 01:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor ranjit