अभिनेता रणवीर सिंह हा कायमच त्याच्या चित्र-विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंग हा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. त्याचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. रणवीरचे हे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. यावर काहींनी तिला ट्रोल केले तर काहींनी रणवीरला समर्थन दिले होते. या सर्व प्रकरणानंतर रणवीर सिंगच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. रणवीर सिंगविरोधात भादंवि कलम २९२, २९३, ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवला़ आहे. नुकतंच या संपूर्ण प्रकरणी मुंबईतील चेंबूर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे.
न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी रणवीर सिंगच्या विरोधात मुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी त्याला बजावली होती. पण कामात व्यस्त असल्याचे कारण देत त्याने चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, असे सांगितले होते. त्यासोबतच त्याने दोन आठवड्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणीही चेंबूर पोलिसांकडे केली होती. यानंतर आज (२९ ऑगस्ट) रणवीरने चेंबूर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. त्यानंतर त्याने पोलिसात आपला जबाब नोंदवला आहे.
आणखी वाचा : विश्लेषण : न्यूड फोटोशूटबद्दल शिक्षेची नेमकी तरतूद काय आहे? जाणून घ्या
रणवीर सिंगने आज सकाळीच त्याच्या लीगल टीमसह हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीत रणवीर सिंगचा जबाब नोंदवण्यात आला. यानंतर तब्बल दोन तासाच्या चौकशीनंतर पोलिसांनी रणवीरला जाण्यास परवानगी दिली. मात्र यापुढे या प्रकरणी पोलिस चौकशीसाठी सहकार्य करावं अशा सूचना त्याला करण्यात आल्या आहेत.
दरम्यान रणवीरने बर्ट रेनॉल्डच्या सन्मानार्थ पेपर मासिकासाठी हे फोटोशूट केलं आहे. डाएट सब्या नावाच्या एका अधिकृत इस्टाग्राम पेजवरुन रणवीरचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. याचसोबतच रणवीरच्या मुलाखतीमधील काही वाक्यंही यासोबत शेअर करण्यात आली आहे. “मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. मला चांगले कपडे घालायला, छान छान खायला आवडतं. मी दिवसातील २० तास काम करतो पण कधीच याबाबत तक्रार करत नाही. मी या सर्व गोष्टींसाठी फार आभारी आणि कृतज्ञ आहे. मात्र यासाठी मला फार कष्ट घ्यावे लागलेत. मी आज ‘गुची’ सारख्या ब्रॅण्डचे कपडे घेऊन डोक्यापासून पायापर्यंत सर्व काही ब्रॅण्डेड वापरु शकतो. तरीही यावरुन कोणी माझ्याबद्दल उलटसुटल बोलत असेल तर त्याची मी पर्वा करत नाही,” असं रणवीरने म्हटलं होतं.
आणखी वाचा : रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर दीपिका पदुकोणची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “हे फोटो पोस्ट करण्यापूर्वी…”
रणवीर हा करण जोहरच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेमकाहानी’ या सिनेमात आलिया भट्टबरोबर झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून त्याची एक झलकदेखील प्रेक्षकांसमोर आली आहे. याबरोबरच रणवीर पुन्हा एकदा दिग्दर्शक रोहित शेट्टीबरोबर सर्कस या चित्रपटात दिसणार आहे.