ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. नुकतंच ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. त्यासोबतच अभिनेता सलमान खान, रितेश देशमुख यासारखे दिग्गज कलाकारही यावेळी उपस्थित होते. धर्मवीरचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडल्यानंतर सलमान खानने याबाबत प्रतिक्रिया दिली.
“दोन मुलांचा अपघाती मृत्यू अन् साहेबांचे ते शब्द”, आनंद दिघेंच्या आठवणीत एकनाथ शिंदे भावूक
सलमान खानची प्रतिक्रिया
“मी आता मराठीत बोलणार आहे. माझे नाव सलमान खान आहे आणि मला हा ट्रेलर फार आवडला. मी आता जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करत होतो, त्यावेळी त्यांनी दिघे साहेबांबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. यातल्या काही गोष्टीत मला माझ्यात आणि त्यांच्या साम्य जाणवले. त्यातील एक म्हणजे ते एका बेडरुममध्ये राहायचे आणि मी देखील एकाच बेडरुममध्ये राहतो. दुसरं म्हणजे त्यांचेही लग्न झालेले नव्हते आणि माझेही झालेले नाही.” असे तो म्हणाला.
“पूर्वी ‘धरम वीर’ (Dharam Veer) नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ‘धर्मवीर’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा, जितका ‘धरम वीरला’ मिळाला होता, अशी मी आशा करतो”, असे सलमान खानने म्हटले.
दरम्यान ‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून आनंद दिघेंची ओळख होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास उलगडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.