हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांमध्ये चांगलीच मैत्री असते, त्यांच्या नात्याबद्दल काय आणि किती बोलावं असा प्रश्नच अनेकांना पडतो. कित्येकांसाठी तर ही कलासृष्टीच एक मोठं कुटुंब असतं. अशा या कुटुंबात असेही काही चेहरे आहेत ज्यांचं एकेकाळी एकमेकांशी पटत नव्हतं. अशाच काही कलाकारांमधील दोन नावं म्हणजे, संजय दत्त आणि ऋषी कपूर.
‘रॉकी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेता संजय दत्तने स्वतःचा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यात यश मिळवलं. हा अभिनेता त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होता. ‘रॉकी’ या चित्रपटातून संजय दत्त आणि टीना मुनिम ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यादरम्यानच संजय आणि टीनाची ऑफस्क्रीन केमिस्ट्री म्हणजेच त्यांचं अफेअरही चर्चेचा विषय ठरत होतं. पण, सहजासहजी होईल तो प्रेमाचा प्रवासच नाही असं म्हणतात ते खरंच असावं. कारण संजय दत्तच्या लव्हस्टोरीतही एक असं वळण आलं होतं ज्यावेळी तो चक्क ऋषी कपूरला मारण्यासाठी गेला होता.
वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या
त्या दिवसांमध्ये टीना मुनिम आणि ऋषी कपूर यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यात ऋषी कपूर आणि टीना यांच्या वाढत्या मैत्रीमुळे शंकांनी घर केलं होतं. तेव्हा ऋषी कपूरचं लग्न झालेलं नव्हतं. त्यांच्यासोबत जोडलं जाणारं टीनाचं नाव संजूबाबाला काही रुचलं नाही. त्यामुळे टीनापासून दूर राहा अशी समज देण्यासाठी संजय दत्त डोक्यात राग घालून आपला चांगला मित्र आणि अभिनेता गुलशन ग्रोवरसोबत थेट नीतू सिंग यांच्या पाली हिल परिसरातील घरी गेला. त्यावेळी त्याची आणि ऋषी कपूर यांची काही गाठ पडली नाही. पण, नीतू सिंग यांनी सर्व प्रसंग सांभाळून नेला आणि हे प्रकरण तिथेच मिटलं. पुढे नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांचं लग्न झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट झालं. संजय दत्त, ऋषी कपूर आणि टीना मुनिम यांच्या आयुष्यातील या विचित्र प्रसंगाचा उल्लेख अन्नू कपूर यांनी एका रेडिओ कार्यक्रमादरम्यान केला. शिवाय ऋषी कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रपर पुस्तकातही याविषयीचा उल्लेख करण्यात आला होता.