दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर १५ दिवसांचा पितृपक्ष येतो. या १५ दिवसांत आपल्याकडे कोणतंच शुभ काम होत नाही. अगदी कोणतीही नवीन गोष्टदेखील आपण घेत नाही. हे १५ दिवस आपल्याकडे पितरांचे असतात असं मानलं जातं. या दिवसांत त्या पूर्वजांचं स्मरण करण्याची आपली संस्कृति आहे. या काळात बरीच लोकं पक्ष, पिंडदान अशी कार्य करतात. नुकतंच बॉलिवूडच्या एका अभिनेत्याने असंच एक कर्मकांड करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे जो सध्या चांगलाच चर्चेत आहे.
बॉलिवूड अभिनेता संजय मिश्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या पितरांना स्मरण करतानाच एक फोटो शेअर केला आहे. याबरोबरच संजय लिहितात की, “वर्षातून एकदा आपल्या पूर्वजांचं स्मरण व्हायला हवं. आपल्या कर्माबरोबरच हा आपला धर्मदेखील आहे.” या फोटोमध्ये संजय मिश्रा हे त्यांच्या पितरांना स्मरण करण्यासाठी बसले असून त्यांच्या रितीरिवाजानुसार ते हे कार्य करताना दिसत आहेत.
संजय यांच्या या पोस्टमुळे त्यांना बऱ्याच लोकांनी ट्रोल केलं आहे तर काही लोकांनी त्यांचं कौतुकही केलं आहे. त्यांच्या काही चाहत्यांनी “हीच आपली संस्कृति आहे, ती तुम्ही जपत आहात याचा आम्हाला अभिमान आहे”असं कॉमेंट करत सांगितलं तर काहींनी हा सगळा भंपकपणा आहे असं म्हणत टीकादेखील केली. फोटोमध्ये संजय मिश्रासमोर बसणारे गुरुजी हे नाना पाटेकरसारखे दिसत असल्याचंही काही लोकांनी खोचक कॉमेंट केल्या आहेत.
आणखी वाचा : Raju Srivastava : “आज तुम्ही आम्हाला…” राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर कपिल शर्मा भावूक
संजय मिश्रा यांनी बऱ्याच चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. कांचली, मसान, आंखो देखीसारख्या चित्रपटात त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली तर गोलमाल, ऑल द बेस्टसारख्या चित्रपटातून त्यांच्या विनोदी भूमिकाही लोकांनी डोक्यावर घेतल्या. संजय आता रोहित शेट्टी दिग्दर्शित रणवीर सिंगच्या ‘सर्कस’ या चित्रपटात पुन्हा एका हलक्या फुलक्या भूमिकेत दिसणार आहेत.