‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. बॉलिवूडच्या किंग खानचा आज ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. विविध चित्रपटातून राहुल, राज, डॉन अशा भूमिका साकारणाऱ्या किंग खानने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. भारतात आणि भारताबाहेर शाहरुखचा तुफान चाहतावर्ग आहे. पण तुम्हाला माहितीय का? शाहरुखचे खरे नाव हे वेगळेचे होते. फार पूर्वी त्याच्या वडिलांनी त्याचे नाव बदलले.
‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘बाजीगर’, ‘डर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिल तो पागल है’, ‘देवदास’ आणि अशा विविध चित्रपटातून शाहरुख खानने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या संवाद कौशल्यापासून ते अगदी दोन हात हवेत पसरवून त्याची ‘सिग्नेचर’ पोझ देण्यापर्यंतच्या त्याच्या अंदाजावर अनेकजण फिदा आहेत. शाहरुखचा अंदाज आणि त्याच्या डायलॉग्सची बॉलिवूडमध्ये खास ओळख आहे.
शाहरुखचे चित्रपट, त्यातील गाणी, त्याने साकारलेल्या भूमिका आणि त्याचे डायलॉग हे एक वेगळेच समीकरण आहे. टेलिव्हीजन मालिकेच्या माध्यमातून शाहरुखचा चेहरा सर्वांसमोर आला. ‘फौजी’ या मालिकेद्वारे शाहरुखची वाटचाल सुरु झाली. त्यानंतर ‘दिवाना’ या चित्रपटापासून सुरु झालेला शाहरुखचा चित्रपटसृष्टीतील सुरू झालेला प्रवास आजतागायत सुरुच आहे.
सुरुवातीला अभिनयाशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या शाहरुखचा किंग खानपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. शाहरुखचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ साली झाला. त्याच्या जन्मानंतर शाहरुखच्या आजीने त्याचे नाव ‘अब्दुल रेहमान’ असे ठेवले होते. मात्र त्यानंतर काही वर्षांनी त्याच्या वडिलांनी नावात बदल केला. त्यावेळी त्याचे नाव ‘शाहरुख’ असे ठेवण्यात आले. लहानपणी तो फार हुशार विद्यार्थी होता. केवळ अभ्यासातच नाही तर हॉकी, फुटबॉलमध्येही अव्वल होता.
‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शाहरुखच्या वडिलांचं कॅन्टीन होतं. त्यावेळी शाहरुख बराच वेळ तिथेच घालवत असे. तिथे बऱ्याच कलाकारांशी त्याची भेट झाली. एकेकाळी शाहरुखने थिएटरबाहेर तिकीटंही विकली होती. त्यातून मिळालेले ५० रुपये ही त्याची पहिली कमाई होती.