आज सोशल मीडियावर फक्त एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. त्यांना ७२ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यांतून लोकं शुभेच्छा देत आहेत. सामान्य माणसापासून मोठमोठे राजकीय नेते, उद्योगपति, सेलिब्रिटीज मोदीजी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. अजय देवगण, विवेक अग्निहोत्रीसारख्या बॉलिवूडच्या कलाकारांनीसुद्धा मोदीजी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खाननेही ट्वीट करत मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुख त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला की, “तुम्ही देशाच्या भवितव्यासाठी जी मेहनत घेत आहात त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तुमची पुढील ध्येयं गाठण्यासाठी तुम्हाला असंच आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापातून एक दिवस सुट्टी घ्या आणि तुमचा वाढदिवस मनापासून साजरा करा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर.”
शाहरुखचं हे ट्वीट पाहून सोशल मीडियावर बरेच लोकं त्याला ट्रोल करत आहेत. पुढील चित्रपटांना बॉयकॉटचा सामना करावा लागू नये म्हणून हे ट्वीट करत आहे असंही काही लोकांनी लिहिलं. काही लोकांनी मात्र त्याच्या या ट्वीटचं कौतुक केलं आहे.
आणखी वाचा : “लाल सिंह चड्ढाला हीट किंवा फ्लॉप…” चित्रपटात आमिरच्या आईची भूमिका साकारणाऱ्या मोना सिंगचं वक्तव्य चर्चेत
एकूणच सगळ्याच क्षेत्रातले दिग्गज आपापल्या परीने मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अनिल कपूर आणि अक्षय कुमार यांनीही फोटो शेअर करत मोदीजी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री कंगना यांनीसुद्धा त्यांच्या खास शैलीत मोदीजी यांना शुभेच्छा देत त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे.