हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही असे काही ट्रेंड येतात जे फॉलो करण्यापासून कलाकारही मागे येत नाहीत. अशाच एका ट्रेंडची चलती पाहता अभिनेता शेखर सुमनसुद्धा या ट्रेंडमध्ये सहभागी झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये पिळदार शरीरयष्टीला अभिनेत्यांनी मोठ्या प्रमाणात महत्त्व दिल्याचे पाहायला मिळत आहे. शेखरनेही त्याच्या शरीरयष्टी आणि फिटनेसकडे जास्त लक्ष दिल्याचे पाहायला मिळते आहे. शेखरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन काही दिवसांपूर्वी जिममधील फोटो पोस्ट केले होते.

प्रत्येक फोटोसोबत त्याने लक्षवेधी कॅप्शनही दिले. व्यायामाचे महत्त्व आणि शारीरिक सुदृढता या गोष्टींकडे त्याने कॅप्शनच्या माध्यमातून नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. जिममध्ये घाम गाळणाऱ्या शेखरचा हा ‘मस्क्युलर लूक’ आजच्या तरुणांनाही लाजवेल असाच आहे. एखाद्या गोष्टीप्रती असणारी ओढ आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी नेमकी काय असते याचा प्रत्यय शेखरचे फोटो पाहून येत आहे.

साठीकडे वाटचाल करणाऱ्या या अभिनेत्याचा हा नवा लूक कोणत्या चित्रपटासाठी आहे का, असा प्रश्नही अनेकांच्या मनात घर करत आहे.
चित्रपटसृष्टीतील चिरतरुण अभिनेत्यांच्या यादीत शेखर सुमनचेही नाव घेतले जाते. ‘मूव्हर्स अॅण्ड शेकर्स’, ‘देख भाई देख’ या कार्यक्रमांमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तच्या ‘भूमी’ या चित्रपटातूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. येत्या काळात त्याच्या कोणत्याही चित्रपटाच्या चर्चा नसल्या तरीही आपल्या मुलासोबत म्हणजेच अध्ययनसोबत फिटनेसच्या शर्यतीत उतरलेला शेखर त्याच्या जिम सेशन्समुळे प्रकाशझोतात आला आहे असेच म्हणावे लागेल.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’