गेल्या काही वर्षांपासून दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मराठी चित्रपटांचा बजेट इतर चित्रपटांच्या तुलनेत जरी कमी असला तरी उत्तम कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळते. ‘नटरंग’, ‘नटसम्राट’, ‘पावनखिंड’ असे अनेक चित्रपट मराठीमध्ये सुपरहिट ठरले. उत्तम कंटेंट हाच चित्रपटांचा राजा आहे हे अगदी खरं आहे. चित्रपट कमी बजेटचा असला तरी चित्रपटाची कथा ही अधिक महत्त्वाची असते. सध्या मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची देखील चलती आहे. यामध्ये ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल.
दर्जेदार चित्रपट तयार होत असताना देखील मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळत नसल्याची खंत कलाकार बऱ्याचदा व्यक्त करताना दिसतात. आता अभिनेता श्रेयस तळपदेने देखील याविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रेयस म्हणाला की, “मला असं वाटतं मराठी चित्रपटांना महाराष्ट्रामध्ये प्राईम टाईम मिळालाच पाहिजे. कारण सगळ्यांनाच दुपारी वगैरे चित्रपट पाहायला जाणं शक्य होत नाही. पण मराठी चित्रपटांनी शोजच्या बाबतीत तडजोड करू नये.”
श्रेयस पुढे म्हणाला की, “मराठी चित्रपटांच्या बाबतीत सुरुवातीला असं व्हायचं की मार्केटींगमध्ये आपण कमी पडायचो. पण आता तशी परिस्थिती नाही. अर्थात अजूनही चित्रपटांचे बजेट कमी आहेत, पण जे चांगले चित्रपट आहेत त्याला प्रेक्षक जातात. चित्रपट बघतात. पावनखिंड, झिम्मा सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. प्रेक्षक चित्रपट बघायला जातच नाही असं होत नाही. चांगला चित्रपट असेल तर कुठूनही प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये पोहोचतात.”
आणखी वाचा – “हिंदी चित्रपट साऊथमध्ये डब करा, तुम्हाला कोणी थांबवलंय?”, श्रेयस तळपदेचा सवाल
महाराष्ट्रामध्येच मराठी चित्रपटांना प्राईम टाईम न मिळणं ही खरंच खूप मोठी बाब आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवाजी’ हा चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला. पण या चित्रपटालाही प्राईम टाईम मिळत नसल्याचं मराठी कलाकार त्यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सांगण्याचा सतत प्रयत्न करत आहेत.