शर्वरी जोशी

प्रेम हा शब्द दिसायला कितीही लहान असला तरी त्याची खोली, त्याची ताकद ही अनुभवल्यानंतरच कळते असं म्हणतात ते काही खोटं नाही. जग जिंकायची ताकद जशी प्रेमात असते तसंच जगण्याचा आधारही प्रेममध्येच असते. अशाच प्रेमाची ताकद दाखविणारा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट आज (२४ जुलै) प्रदर्शित झाला. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला.

आयुष्यात कितीही संकटं आली तरी त्यावर हसत-हसत कशी मात करावी हे सांगण्याचा प्रयत्न मुकेश छाबडा यांनी ‘दिल बेचारा’मधून केला आहे. मोजक्या कलाकारांच्या मदतीने एक दमदार संदेश त्यांनी या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे हा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी चित्रपटातील कलाकारांनीही तितकीच मेहनत घेतल्याचं पाहायला मिळतं.

प्रेम करण्यासाठी आवडी-निवडी किंवा विचार जुळण्याची गरज नसते. तर गरज असते ती मनं जुळण्याची. एकदा का मनं जुळली की प्रेमातील अनेक अडथळे सहज पार होतात. अनेक नकारात्मक गोष्टींकडे पाठ करुन सकारात्मक दृष्टीकोन पाहण्याची नवी प्रेरणा देतात. अशीच प्रेरणा किझीला मिळाली ती मॅनीकडून…मॅनी म्हणजे इॅमॅन्युअल राजकुमार ज्युनिअर (सुशांत सिंह राजपूत). कर्करोगासारख्या आजाराशी लढा देत इतरांची लहान-लहान स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारा तरुण. एका पायाने अपंगत्व आलेल्या मॅनीची भेट किझीशी (संजना सांघी) होती. थायरॉईड कर्करोगाशी लढा देणारी किझी कायम तिच्यात स्वमग्नतेत गर्त असते. कमी मित्र-मैत्रिणी आणि आपल्यातच नादात राहणाऱ्या किझीला मॅनी जगण्याची नवी प्रेरणा देतो. जगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचं नवं धैर्य देतो. त्यांच्या याच प्रवासात ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि या चित्रपटाची खरी रंगत वाढते. किझी, अभिमन्यू वीर या गायकाची प्रचंड मोठी चाहती असते आणि त्याला भेटण्यासाठी ती थेट पॅरिस गाठण्यास तयार असते. मात्र तिचा हा मार्ग तितका सोपा नव्हता. यात अनेक अडचणी होत्या. मात्र मॅनीच्या मदतीने आणि प्रेमामुळे ती पॅरिसला पोहोचते. परंतु, पॅरिसला गेल्यावर तिची आणि अभिमन्युची भेट होते की नाही हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ‘दिल बेचारा’ हा चित्रपट पाहावा लागेल.

‘काइ पो छे’, ‘छिछोरे’, ‘केदारनाथ’ अशा चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आपल्या अभिनयाची दमदार बाजू दाखविणारा सुशांत या चित्रपटातही प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरतो. उत्तम अभिनय, संवादकौशल्य आणि चेहऱ्यावरील स्मित हास्य यांच्या जोरावर सुशांतने या चित्रपटाची अर्धी बाजी जिंकली आहे. यात त्याला साथ मिळाली ती नवोदित अभिनेत्री संजना सांघीची. किझीची भूमिका साकारणाऱ्या संजनाने पहिल्याच प्रयत्नात प्रेक्षकांना तिचं अभिनय कौशल्य दाखवून दिलं आहे. तर सुशांत आणि संजनासह स्वस्तिका मुखर्जी आणि अन्य कलाकारांनीही उत्तम अभिनय केला आहे.

‘दिल बेचारा’ हा चित्रपट सुशांतच्या आयुष्यातील अखेरचा चित्रपट ठरला. मात्र हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर कोरला जावा असा अभिनय सुशांतने यात केल्याचं पाहायला मिळालं. एखादा चित्रपट यशस्वी ठरण्यामागे केवळ दिग्गज कलाकार आणि मोठ-मोठे सेटच गरजेचे नसतात हे मुकेश छाबडा यांनी ‘दिल बेचारा’मधून दाखवून दिलं आहे. यात त्यांना ए.आर.रहमान सारख्या दिग्गज संगीतकाराची साथ मिळाली.

दरम्यान, सुशांतच्या करिअरमधील आणि जीवनातील अखेरचा चित्रपट ठरलेल्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटातून अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटातून प्रेमाची एक नवी व्याख्या प्रेक्षकांसमोर सादर झाली आहे. त्यामुळे सुशांत देहरुपी जरी आज नसला तरीदेखील तो या चित्रपटाच्या माध्यमातून कायम चाहत्यांसोबत असेल हे दिसून आलं.

शर्वरी जोशी

sharvari.joshi@loksatta.com

Story img Loader