जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरल्याचे पहायला मिळाले. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत व्यापारी संबंध तोडले. तसेच भारतीय चित्रपटांवरही पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. त्यावर आता बॉलिवूडमधूनही काही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बॉलिवूड चित्रपटांवर बंदी घालून पाकिस्तानने आपलंच नुकसान करून घेतलं आहे. यात बॉलिवूडचं काहीही नुकसान नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.

“पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्याचे वक्तव्य केले. परंतु यामध्ये पाकिस्ताननचेच नुकसान आहे. बॉलिवूडला याचा काहीही फरक पडणार नाही,” अशी प्रतिक्रिया अभिनेता सोनू सूद याने दिली आहे. तसेच कलम 370 हटवणे ही गेल्या 72 वर्षांमध्ये झालेली सर्वात चांगली बाब असल्याचेही तो म्हणाले.

तर दुसरीकडे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता मधुर भंडारकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. “पाकिस्तानने द्विपक्षीय संबंध तोडले यात मला कोणती कोणतेही आश्चर्य वाटले नाही. भारताने कलम 370 रद्द केलंय आणि त्यांना पाकिस्तानातील लोकांसमोर आपली काहीतरी भूमिका मांडायची आहे. भारतीय चित्रपटसृष्टीनेही पुलवामा हल्ल्यानंतर एकी दाखवली होती.”

तर दुसरीकडे मूळ जम्मूचा असलेल्या अभिनेता विद्युत जामवाल याने प्रतिक्रिया देत “हिंदी चित्रपटसृष्टीने पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या सन्मानात पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित करणं बंद केल्याचं म्हटलं आहे. हे फक्त सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आले नव्हते. बॉलिवूडचे चित्रपट जगभरात उत्तम प्रदर्शन करत आहेत. कलम 370 रद्द करण्याचं उचललेलं पाऊल धाडसी आणि आवश्यक होते,” असंही तो म्हणाला.

तर फिल्म ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारतीय चित्रपटसृष्टीला मोठं नुकसान होणार असल्याचं म्हटलं आहे. “मोठी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटांसाठी पाकिस्तान महत्त्वपूर्ण आहे. शाहरूख खान, सलमान खान, अमिर खान यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट त्या ठिकाणी उत्तम प्रदर्शन करतात. त्या ठिकाणी चित्रपट प्रदर्शित झाले नाही, तरी चित्रपटांची पायरसी तर होणार. त्यामुळे पाकिस्तानातील लोक आमचे चित्रपट पाहणार नाहीत, असं होणार नाही. यामुळे भारतात जो पैसा येत होता, तो फक्त येणार नाही,” असे ते म्हणाले.