बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या ‘डार्लिंग’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे आलिया भट्ट ही निर्माती म्हणून पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे ती या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या निमित्ताने आलिया भट्टने‘इंडियन एक्सप्रेस अड्डा’ला मुलाखत दिली. यावेळी तिने बॉलिवूडसह हॉलिवूडमधील विविध विषयांवर भाष्य केले.
या मुलाखतीत आलियाला सिनेसृष्टीतील कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘सिनेसृष्टीत कलाकारांच्या मानधनात संतुलन असावे, असे तुला वाटते का?’ असा प्रश्न आलियाला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली,”यावर उत्तर द्यायला मी अजून फार लहान आहे.”
“एखाद्या कलाकारांचं मानधन आणि चित्रपटाचं बजेट यांच्यामध्ये संतुलन असायला हवं. पण कुठल्या कलाकारानं किती मानधन घ्यावं हे मी कसं ठरवणार? कारण मी अजून खूप लहान आहे.”, असे आलिया भट्ट म्हणाली.
या मुद्द्यावर बोलताना ती पुढे म्हणाली, “एखादा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अनेक कलाकारांनी आपलं मानधन परत केलं आहे. मला असे अनेक प्रसंग माहीत आहेत. कलाकार फक्त प्रचंड मानधन घेतात असं नाही तर चित्रपट अयशस्वी झाला तर ते परतही करतात.”
दरम्यान या मुलाखतीत आलियाला, ‘सध्या बॉलिवूड चित्रपटांसाठी कठीण काळ आहे अशात निर्माती होण्याचा निर्णय घेणं आव्हानात्मक वाटलं नाही का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “नाही, कारण मला वाटतं हे संपूर्ण वर्ष भारतीय चित्रपटांसाठी कठीण काळ आहे. आपण फक्त सातत्यानं हिंदी चित्रपटांबद्दल बोलतोय. पण आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा आकडा पाहता आपल्या हे लक्षात येईल की संपूर्ण देशभरात फार कमी चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले.
Exclusive : बॉलिवूड कलाकारांवर राज्याकडून दबाव आणला जातोय का? आलिया म्हणाली…
अगदी दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल बोलायचं तर त्यातले सर्वच चित्रपट हिट झालेले नाहीत. काही निवडक चित्रपट खूपच हिट ठरले. हिंदी चित्रपटांचंही तसंच आहे. हिंदीतील काही चित्रपटांनीही चांगला गल्ला जमवला आहे. ज्या चित्रपटाचा कंटेन्ट चांगला आहे. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे आणि हे नेहमीच होतं, असेही तिने म्हटले.