अभिनेत्री सोनम कपूर मागोमाग आता अभिनेत्री अॅमी जॅक्सननेही स्वत:चे अॅप लॉन्च केले आहे. न्यूयॉर्कच्या ‘एस्कपेक्स’ या एका स्टार्टअपच्या साथीने अॅमीने तिचे हे अॅप लॉन्च केले आहे. या अॅपच्या माध्यमातून अॅमीच्या चाहत्यांना थेट तिच्या सोशल मीडिया अकाऊंटशी जोडता येणार आहे. त्यासोबतच अॅमीच्या संबंधीची बरीच माहितीही या अॅपद्वारे मिळणार आहे. या अॅपमधून अॅमी स्वत: चाहत्यांच्या कमेंट्सची निवड करणार असून त्या कमेंट्स पाहता देखील येणार आहेत. हे अॅप संपूर्णत: निशुल्क असून त्यावर अॅप वापरणाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा काही जाहिरातीसुद्धा दाखवण्यात येणार आहेत.

सध्या अॅमी ‘२.०’ या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. अॅप लॉन्च झाल्यानंतर अॅमीने तिची प्रतिक्रियााही दिली. ‘येणारे दिवस माझ्यासाठी फारच महत्त्वाचे आहेत. माझी बरीच कामं रांगेत आहेत. या सर्वच आगामी प्रोजेक्ट्सबद्दल तुम्हाला या अॅपवर सर्वप्रथम माहिती मिळणार आहे. या अॅपच्या माध्यमातून मला सोशल मीडियाचा एक वेगळा पैलू पाहण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे चाहत्यांशी एका वेगळ्या पातळीवर जाऊन संवाद साधण्यासाठी मी फार उत्सुक आहे’, असे अॅमी म्हणाली.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूरनेही तिचे एक अॅप लॉन्च केले होते. त्यामुळे सोनममागोमाग अॅमीही तिच्या पावलावर पाऊल ठेवत आहे असेच म्हणावे लागेल. अॅमी लुइस जॅक्सन म्हणजेच बॉलिवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सन ही एक ब्रिटिश मॉडेलदेखील आहे. अॅमीने अधिकतर तमिळ सिनेमात काम केले आहे. तिने काही हिंदी सिनेमातही काम केले आहे. तिने वयाच्या १६व्या वर्षापासून मॉडेलिंग सुरु केले होते. २००९ मध्ये ‘मिस टीन वर्ल्ड’ हा किताबही तिने पटकावला होता. याशिवाय २०१० मध्ये ‘मिस लिव्हरपूल’ हा किताब तिने आपल्या नावावर केला होता. याच दरम्यान दिग्दर्शक एएल विजय यांनी तिला पाहिले आणि ‘मद्रासपट्टिनम’ या सिनेमासाठी तिला विचारले. हा तिचा पहिला तमिळ चित्रपट होता.

Story img Loader