अभिनेत्री अर्चना पूरण सिंग उत्कृष्ट अभिनेत्री आहेतच, शिवाय त्या सध्या कपिल शर्माच्या कार्यक्रमामुळे चर्चेत असतात. अर्चना यांनी त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात खलनायिकेपासून सहनायिकेपर्यंत सगळ्या भूमिका केल्या. पण अर्चना यांच्यावर विनोदी भूमिकांचा शिक्का बसला तो कायमचाच. शिवाय एक अभिनेत्री म्हणून त्यांना याचा त्रास होतो, त्या विनोदी भूमिका सोडून गंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने करू शकतात हा त्यांचा आत्मविश्वास आहे. याबद्दलच त्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
अर्चना म्हणाल्या की, “मला या एकाच साच्यातल्या भूमिकांचा कंटाळा आला आहे. २५ वर्षं उलटून गेली तरी अजूनही ‘कुछ कुछ होता है’मधील मिसेस ब्रीगांझासारख्या भूमिका माझी पाठ काही सोडत नाहीत. लोकांना वाटतं की मी फक्त विनोदी भूमिकाच उत्तमरित्या करू शकते. एक अभिनेत्री म्हणून मला याचं वाईट वाटतं, माझ्यात अजूनही उत्तम आणि वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायची तळमळ आहे.”
आणखी वाचा : “लोक मला कंडक्टर समजायचे कारण…” बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला ‘तो’ अनुभव
हॉलिवूडमध्ये साचेबद्ध भूमिकांकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यावर अर्चना म्हणाल्या, “त्यांच्यामते एकाच प्रकारच्या भूमिका मिळणं हे चांगलं असतं, कारण लोकांना तुम्ही त्याच भूमिकांमध्ये पसंत असता. माझ्यामते ही गोष्ट कलाकाराचा घात करते. मला चांगलं आठवतंय की नीना गुप्ता यांनीही चांगल्या भूमिकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केली होती, आज माझ्यावरही तशीच वेळ आली आहे.”
आपल्या अभिनयाच्या करकीर्दीच्या सुरुवातीलाच अर्चना यांनी नसीरुद्दीन शाह सारख्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. शिवाय ‘अग्निपथ’, ‘सौदागर’, ‘शोला और शबनम’ या चित्रपटातील त्यांच्या कामाची खूप लोकांनी प्रशंसा केली. याबरोबरच ‘कुछ कुछ होता है’, ‘क्रिश’, किंवा ‘बोल बच्चन’सारख्या चित्रपटातील त्यांची विनोदी भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. अर्चना पूरण सिंग सध्या कपिल शर्माच्या कार्यक्रमाचा एक अतूट हिस्सा आहेत.