अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना दिवसागणिक उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातही या दोघांच्याही सोशल मीडिया पोस्ट पाहून त्याविषयीचे बरेच तर्क लावण्यासही अनेकांनी सुरुवात केली आहे. सध्या हे बहुचर्चित सेलिब्रिटी कपल चर्चेत आहे ते म्हणजे रणवीरच्या एका फोटोमुळे.
इन्स्टाग्रामवर रणवीरने पोस्ट केलेल्या एका फोटोवर दीकिने केलेली कमेंट पाहता आता ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो’, असाच काहीसा पवित्रा या जोडीने घेतल्याचं पाहायला मिळत आहे. रणवीरच्या या फोटोवर कमेंट करत दीपिकाने ‘माईन’ म्हणजेच ‘माझा…’ असं लिहिलं आहे. त्यासोबत तिने काही इमोजीही जोडले आहेत. ज्यामुळे आता रणवीर आणि दीपिका त्यांच्या नात्याविषयी खुलेपणाने व्यक्त होऊ लागले आहेत, असंच अनेकांचं म्हणणं आहे.
वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?
रणवीरवर हक्क सांगणारी दीपिका सध्या अनेक नेटकऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद देऊन जात आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला या सेलिब्रिटी जोडीच्या अफेअरच्या चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्या लग्नाच्या खरेदीलाही सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे. असं असलं तरीही या दोन्ही कलाकारांकडून त्यांच्या नात्याविषयी अद्यापही कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वांचच लक्ष त्यांच्या लग्नाच्या घोषणेकडे लागून राहिलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.