‘हो मी स्त्री आहे. मला स्तन आहेत. तुम्हाला काही आक्षेप आहे का?’, असा थेट प्रश्न विचारणाऱ्या दीपिका पदुकोणवर लोकांकडून संमिश्र प्रतिक्रियांचा भडिमार होतो आहे. दीपिकाचा हा पवित्रा स्टंटगिरी आहे इथपासून ते तिच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीसाठी केलेली अफलातून योजना आहे, अशा प्रतिक्रियांची सोशल मीडियावर भाऊगर्दी झाली आहे. मात्र बॉलीवूडमधील तिच्या सहकाऱ्यांनी विशेषत: प्रियांका चोप्रापासून कीर्ती सननसारख्या आत्ताच्या तरुण अभिनेत्रींनीही दीपिकाने दाखवलेल्या धाडसाबद्दल तिचे कौतुक केले आहे. दीपिकाने पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगवर आपली भूमिका सविस्तर स्पष्ट केली आहे. ते वाचल्यानंतर बॉलीवूडच्या आजच्या अभिनेत्रींनी ‘देह’भानापलीकडे जाऊन आमच्या ‘आत्म’भानाचाही विचार करा, त्याचा सन्मान करा, अशी कणखर भूमिका घेतल्याचे लक्षात येईल.
हिंदी चित्रपटांमधून स्त्रीची प्रतिमा नेहमीच ‘सौंदर्याची बाहुली’ एवढय़ापुरतीच मर्यादित राहिली आहे. आतापर्यंत चित्रपटाच्या नायकाला केंद्रस्थानी ठेवून कथा लिहिल्या जातात. त्यांचा मानधनाचा आकडाही मोठा असतो. एखाद्या अभिनेत्रीला आपला ठसा उमटवायचा असेल तर स्त्रीप्रधान कथा शोधाव्या लागतात. आणि मग क्वचित कधीतरी त्यांना असा आपल्या अभिनयगुणांना वाव देणारा चित्रपट मिळतो. मग त्यांची सक्षम अभिनेत्री म्हणून गणना होते..वगैरे..वगैरे.. ही प्रथा आत्ताच्या अभिनेत्रींनी मुळातच झुगारून टाकली आहे. व्यावसायिक चित्रपटांच्या साच्यात राहूनच तथाकथित नायकांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे आणि नावलौकिक कमवायचा, हे धोरण त्यांनी अवलंबले आहे. म्हणूनच मागच्या दोन वर्षांत दीपिका, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ यांनी केलेले चित्रपट पाहिले तर व्यावसायिक चित्रपटांमधून त्यांनी मिळवलेले यश मोठे आहे. यावर्षी तर आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या बिग बजेट हिंदी चित्रपटांमध्ये निम्मे चित्रपट हे नायिकाप्रधान आहेत आणि त्यापैकी प्रत्येक चित्रपटाने तिकीटबारीवर मिळवलेले यश हे ३० ते ७० कोटींच्या घरात आहे. व्यावसायिक स्तरावर एक सक्षम अभिनेत्री म्हणून आपले अस्तित्व सिद्ध केल्यानंतरही त्यांच्या अभिनयाबद्दल चर्चा होण्याऐवजी त्यांच्या ‘मिसफिट’ कपडय़ांबद्दल, त्यांच्या अंतर्वस्त्रांबद्दल चर्चा केली जावी. एवढेच नाही तर केवळ आपल्या साइटचे हिट वाढवण्यासाठी अशी छायाचित्रे दाखवून खुलेआम त्यांची बदनामी केली जावी, याला अभिनेत्रींनी आक्षेप घेतला तर त्यात चुकीचे काहीच नाही. उलट, त्यांनी याआधीच एवढी कणखर भूमिका घ्यायला हवी होती.
मात्र, अशी जाहीर भूमिका घेण्यासाठी धाडस लागतं. दीपिकाने जे केलं ते मला शक्य झालं नसतं, अशी जाहीर कबुली स्वत:ला बॉलीवूडचा बादशाह म्हणवून घेणाऱ्या शाहरुख खानने दिली आहे. तिने थेट आणि सरळ शब्दांमध्ये आपलं म्हणणं मांडलं आहे. त्याच्यावर आम्ही काही बोलणंही योग्य ठरणार नाही. मात्र, आम्ही तिच्यामागे खंबीरपणे उभं राहू शकतो आणि आम्ही ते करत आहोत, असं शाहरुखने सांगितलं. प्रियांका चोप्राने मात्र एक पाऊल पुढे जात सगळ्या अभिनेत्रींच्या वतीने पुढाकार घेऊन अशी भूमिका मांडल्याबद्दल दीपिकाचं कौतुक के लं आहे. अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, हुमा कुरेशी, फराह खान, निम्रत कौर, कीर्ती सनन अशा कित्येक अभिनेत्रींनी आपल्या मनात असलेली खदखद कोणीतरी जाहीरपणे ठणकावून सांगितली याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हे धाडस, हा आत्मविश्वास कुठेतरी त्यांच्या व्यावसायिक मेहनतीतून आणि त्यांना मिळणाऱ्या यशातून आला आहे. आणि तसे असेल तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला हा ठळक बदल आहे, असे म्हणावे लागेल.
दीपिकाच्या आक्रमक पवित्र्यामुळे का होईना इतकी र्वष फॅ शन आणि ग्लॅमरच्या जगतात वावरणाऱ्या मॉडेल्स, अभिनेत्रींच्याच नव्हे तर सर्वसामान्य स्त्रियांच्याही मनातल्या उद्वेगाला जाहीर वाट मिळाली आहे. त्याने बदल होईल, अशी अपेक्षा करणे धाडसाचे ठरेल. मात्र यानंतर प्रत्येक स्त्री आपल्यावर होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या अन्यायाविरोधात आवाज उठवू शकली तरी ती एक नवी सुरुवात ठरेल.
सडेतोड..
चित्रपटातील त्यांची प्रतिमा जोखून प्रत्यक्षातही त्या त्याच पद्धतीने वागत असतील असे गृहीत धरणाऱ्यांमध्ये सर्वसामान्यच नव्हे तर इंडस्ट्रीतील महाभागही आहेत. पडद्यावर ‘बिकीनी बेब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिपाशाला एका दिग्दर्शकाकडूनच अशा प्रकारचा वाईट अनुभव आल्याचे बोलले जाते. मात्र, बिपाशाने असा काही प्रसंग आपल्यासोबत घडणं शक्यच नाही असं म्हटलं आहे. प्रत्यक्षात वावरताना मी फार रोखठोक वृत्ती बाळगते. त्यामुळे माझ्याबरोबर गैरप्रकार करण्याचा विचारही मनात आणण्याची हिंमत कोणी करणार नाही, असं बिपाशाने सांगितलं. तर परिणितीलाही एका पत्रकार परिषदेत तुम्ही जेव्हा नवीन असता, तुम्हाला तुमचं कोडकौतुक हवं असतं. तुम्ही वाट्टेल ते स्वीकारता आणि तीच गोष्ट तुम्ही थोडय़ा मोठय़ा झाल्यानंतर का नाकारता? असा प्रश्न विचारल्यानंतर परिणितीनेही त्याला सगळ्यांसमोर चार कडक शब्द सुनावले होते. अभिनेत्रींच्या सार्वजनिक वावराबद्दल, त्यांच्या स्टाईलबद्दल सातत्याने माध्यमांमधून चर्वितचर्वण केलं जातं. ‘धूम ३’च्या प्रसिद्धी कार्यक्रमात भर व्यासपीठावर पंख्यामुळे कतरिनाचा छोटासा ड्रेस हलकासा उडाला म्हणून गहजब झाला होता. अभिनेत्री कंगना राणावतवर तर सातत्याने या गोष्टींबद्दल टीका होत राहिली आहे.
चित्रपटांमधून भूमिका करताना अंगभर कपडे घालण्याची किं वा कपडे न घालण्याचीही आपली तयारी आहे. चित्रपटात गरज असेल तर मी कधीही अंगप्रदर्शन करण्यात लाज बाळगलेली नाही. मात्र, तेव्हा जी चर्चा होते ती त्या भूमिकेची असते. चित्रपटापुरतीच मर्यादित असते. प्रत्यक्षात कोणतीही अभिनेत्री आज मला अंगप्रदर्शन करायचं आहे असं ठरवून बाहेर पडत नाही. अशा वेळेला त्यांच्या ज्या चुका होतात त्या मुद्दाम ठळकपणे आपल्या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीसाठी दाखवताना तुम्ही प्रत्यक्ष त्या संबंधित अभिनेत्रीची वैयक्तिक प्रतिमा जनमानसात मलिन करत असता. हे अयोग्य आहे. एकीकडे स्त्री सक्षमीकरणाच्या गप्पा मारल्या जातात आणि दुसरीकडे जाणीवपूर्वक त्यांच्या देहाचे प्रदर्शन केले जाते हा दुटप्पीपणा थांबला पाहिजे. अभिनेत्रींची ‘पडद्यावरची’ आणि ‘प्रत्यक्षातली’ प्रतिमा यांच्यात गल्लत केली जाऊ नये. चित्रपटाबाहेरच्या जगात एक माणूस म्हणूनच त्यांचा विचार झाला पाहिजे, त्यांना सन्मान आणि प्रेम दिले पाहिजे.
दीपिका पदुकोण

Story img Loader