गेल्या काही वर्षांमध्ये ट्रेकिंग, बाइकिंग आणि इतर थरारक खेळांमध्ये मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुलीही त्याच उत्साहाने सहभागी होत आहेत. मुख्य म्हणजे मुलींसाठी या चौकटीबाहेरच्या क्षेत्रांमध्ये कधीच प्रवेश निषिद्ध नव्हता. गरज होती ती फक्त मानसिकता बदलण्याची. हीच मानसिकता बदलण्यासाठी काही महिलांनी आणि सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला. साचेबद्ध जगण्याला शह देत, मानसिकता बदलण्यासाठी पुढे सरसावणाऱ्यांपैकीच एक म्हणजे अभिनेत्री गुल पनाग. बाइकर, ट्रेकर, एविएटर, निर्माती अशा विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणारी गुल आता फॉर्म्युला रेसिंगमध्येही सक्रिय झाली आहे. इतकच नव्हे तर फॉर्म्युला इ कार चालवणारी गुल पहिली भारतीय महिला ठरली आहे.
गुलने ‘महिंद्रा’ कंपनीच्या फोर्थ जनरेशनची ‘एम४ इलेक्ट्रो’ (M4Electro) ही फॉर्म्युला इ रेस कार चालवली आहे. स्पेनमधील ‘सर्किट डी कॅलफत’ येथील रेसिंग ट्रॅकवर गुलने हा नवा पायंडा घातला. फॉर्म्युला इ रेस कार चालवण्यापूर्वी तिला यासंबंधीचं रितसर प्रशिक्षण देण्यात आलं होतं. गुलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या अविस्मरणीय अनुभवाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या धमाल अनुभवाविषयी सांगताना गुल म्हणाली, ‘ही कार चालवणारी मी पहिली भारतीय महिला आहे हे जाणून मला फारच आनंद होतोय. ‘एम४ इलेक्ट्रो’ ही भन्नाट कार असून, मला तिच्या वेगमर्यादेबद्दल थोडीफार माहिती होती. कारण या कारमधील ‘इव्ही’ टेक्नॉलॉजीबद्दल मी जाणून होते. ही कार चालवताना आपण जणू काही भविष्यच चालवत आहोत असं मला वाटत होत.’ याआधी गुल पनागने ‘महिंद्रा’ची ‘इ२ओ प्लस’ ही कार चालवली आहे. किंबहुना ती कार गुलच्याच मालकीची आहे. हे वाचून आश्चर्यचकित होऊन जाऊ नका. कारण, गुल पनागला नवं तंत्रज्ञान, रेसिंग कार, बाइक्स यांमध्ये जास्त रस आहे. डोंगराळ भागांमध्ये रोडट्रीपवर जाण्यासाठी गुलकडे स्वत:ची कस्टमाइज महिंद्रा स्कॉरपिओसुद्धा आहे. गुलने तिच्या या कारचं नाव ‘सुपर माइलो’ असं ठेवलंय.
२००३ मध्ये ‘धूप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी गुल पनाग अभिनयाव्यतिरिक्त इतरही क्षेत्रांमध्ये सक्रिय आहे. तिच्या काही गाजलेल्या चित्रपटांपैकीच एक चित्रपट म्हणजे ‘डोर’. या चित्रपटात डीग्लॅम लूकमध्ये झळकलेल्या गुलने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.