बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या आजारी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हॉस्पिटलमधील काही फोटोज शेअर केले आहेत. हे फोटोज पाहून तिचे चाहते चिंतित आहे. इलियानाला नेमकं काय झालं आहे हे त्यांना जाणून घ्यायचं आहे.
इलियानाने हॉस्पिटलच्या बेडवरून फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये इलियाना फारच आजारी आणि थकलेली दिसत आहे. एका फोटोमध्ये अभिनेत्रीच्या हातात सलाईन लावलेलं दिसत आहे. हे फोटो शेअर करत इलियानाने पोस्टमध्ये लिहिलं की, “एक दिवसही तुमच्या आयुष्यात खूप बदल घडवू शकतो… काही प्रेमळ डॉक्टर आणि आयव्ही फ्लुइड्सच्या तीन पिशव्या!”
आणखी एक फोटो शेअर करत तिने तिच्या तब्येतीबद्दल माहीती दिली आहे. इलियानाने लिहिले की, “जे लोक माझ्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी मला मेसेज करत आहेत. त्यांचे खूप खूप आभार, मला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी आता पूर्णपणे ठीक आहे. मला वेळेत योग्य आणि चांगली वैद्यकीय सेवा मिळाली आहे.”
इलियानाने दाक्षिणात्य तसेच बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने वयाच्या १९ व्या वर्षी मॉडेलिंगपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. इलियानाचा पहिला चित्रपट ‘देवासु’ होता. या चित्रपटासाठी तिला दक्षिणेतील सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. इलियानाचा रणबीर कपूरबरोबरचा ‘बर्फी’ हा बॉलिवूड डेब्यू चित्रपट होता. नंतरही ती ‘रुस्तम’, ‘बादशाहो’, ‘रेड’सारख्या बऱ्याच हिंदी चित्रपटात झळकली.