‘विटी दांडू’ या चित्रपटाच्या निमित्ताने अजय देवगण हे नाव मराठी चित्रपटांशी जोडले गेले. योगायोगाने का होईना तनुजा यांच्या ‘पितृऋण’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा अजयमुळे काजोल आणखी एका मराठी चित्रपटाशी जोडली गेली आहे. दोन वेगवेगळ्या काळातले आजोबा आणि नातवांची ही गोष्ट आज घरातल्या प्रत्येकाने पाहायलाच हवी, असे काजोल आग्रहाने सांगते. आजची आपली पिढी गोंधळलेली आहे. आपल्या मुलांना कसे वाढवायचे? त्यांना जुने संस्कार शिकवायचे की नव्या विचारांचे स्वातंत्र्य द्यायचे या प्रश्नांतच आपली पिढी अडकल्याचे मत तिने व्यक्त केले.
‘विटी दांडू’ हा चित्रपट काजोलने आपली दोन्ही मुले निसा आणि युग यांना दाखवला आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलताना काजोलमधली आई जास्त व्यक्त होते. ‘हा चित्रपट पाहताना एकीकडे आपल्या देशातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, त्यांचे बलिदान किती महत्त्वाचे होते ते पाहून ऊर अभिमानाने भरून येतो. त्याच वेळी दुसरीकडे या अभिमानाच्या गोष्टी मी जेव्हा निसाला सांगायचा प्रयत्न करते. तेव्हा ती कायम मला म्हणते असते, ‘तू इतिहासातल्या गोष्टी सतत का सांगतेस? आजच्या इंटरनेटच्या काळात या गोष्टींची गरज नाही’. आज आपली मुले ज्या हक्काने बोलतात, वावरतात ते स्वातंत्र्य आपल्या आधीच्या पिढय़ांना नव्हते. दीडशे वर्षांचा एक मोठा काळ गेला आहे हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी.. आणि आज आपली मुले हा इतिहास समजून न घेता ते स्वातंत्र्य गृहीत धरतात, याबद्दल काजोलने खंत व्यक्त केली. आपल्या मुलांना स्वातंत्र्याचा, जगण्याचा खरा अर्थ समजून द्यायचा असेल तर आपल्या पिढीचे गोंधळलेपण संपले पाहिजे, असेही ती म्हणते.
आपली पिढी खरेच गोंधळलेली आहे. हात सॅनिटरी हँडवॉशने धुवायचे की नुसत्या साबणाने धुवूनही ते स्वच्छ होतात, एवढय़ा साध्या निर्णयातही आपण गोंधळलेलो असतो. हा गोंधळ संपवायचा असेल तर आपल्या मुलांनी जुने संस्कार, नीतिमूल्येही घेतली पाहिजेत आणि त्यांना नव्या आचार-विचारांशीही जुळवून घ्यायचे आहे. मात्र, हा समतोल साधण्याचे काम आपल्या पिढीनेच केले पाहिजे, असेही ती ठामपणे सांगते. ‘विटी दांडू’सारख्या उत्तम चित्रपटाशी ‘अजय देवगण फिल्म्स’चे नाव जोडले गेले त्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच मराठी चित्रपटांनी शंभर कोटी कमवावेत की नाही याचा विचार करण्यापेक्षा मराठी चित्रपटांमध्ये जो विश्वास आहे, गुणवत्ता आहे, आशयाचा दर्जा आहे तो कधीही सोडता कामा नये. आशय-विषयातले वेगळेपण आणि त्याची उत्कृष्ट मांडणी ही मराठी चित्रपटांची खरी ओळख राहिली आहे. ती ओळख त्यांनी कायम टिकवली पाहिजे, असे ती म्हणते.

Story img Loader