बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने आपल्या करिअरच्या सुरूवातीला अनेक हिट सिनेमे दिले. ९० च्या दशकात तिने रटाळ भूमिकांना छेद देत ‘क्या केहना’सारखा सिनेमा केला. प्रिती तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे जेवढी चर्चेत असायची तेवढीच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होती. प्रिती आणि व्यावसायिक नेस वाडिया यांचे अनेकवर्षांचे नाते जेव्हा तुटले तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. प्रिती आणि नेस लवकरच लग्न करणार अशा बातम्या येत असताना त्यांच्या ब्रेकअपची बातमी पुढे आल्यामुळे तिचे चाहते निराश झाले होते.
प्रितीचे बॉलिवूडमध्ये सगळ्यांसोबतच मैत्रीपूर्व संबंध राहिले आहेत. पण या सगळ्यात सलमानसोबतची तिची मैत्री नेहमीच खास होती. प्रितीच्या आधी नेस अमिशा पटेलला डेट करत होता. नेसला अभिनेत्रींना डेट करणं नेहमीच आवडायचं.
‘जनसत्ता डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सलमान खानची एक ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांमध्ये लिक झाल्यामुळे प्रिती आणि नेसचे नाते कायमचे तुटले. या क्लिपमध्ये सलमानने प्रितीबद्दल काही वैयक्तिक प्रतिक्रीया दिली होती. तेव्हा प्रिती नेससोबत परदेशात सुट्टीचा आनंद घेत होती. भारतात परतल्यावर प्रितीने ही टेप लीक करणाऱ्या संस्थेविरोधात तक्रार दाखल केली होती. पण न्यायालयात हा खटला फार काळ टिकला नाही. या टेपमुळे नेस आणि प्रितीमध्ये अनेकदा भांडणं झाली. शेवटी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
काही दिवसांपूर्वी नेस वाडियाची आजी दीना वाडियाचे निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रिती दुःखी झाली होती. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या त्या कन्या होत्या. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांचे न्यूयॉर्कच्या राहत्या घरी निधन झाले. ‘दीना यांच्या निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. त्या फार सुंदर आणि साहसी होत्या. मी फार भाग्यवान आहे की मी त्यांना भेटू शकले. मी त्यांची चाहती आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.’ प्रितीने अशा शब्दांत त्यांना श्रध्दांजली वाहिली होती.