सध्या बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून बऱ्याच लोकांचा हा गैरसमज झाला की या दोघी एकाच चित्रपटात झळकणार आहेत. पण हा व्हिडिओ खरंतर हॉटस्टारच्या नव्या आलेल्या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी बनवण्यात आला आहे. HBO ची ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’ या वेबसीरिजचं प्रक्षेपण आजपासून हॉटस्टारवर सुरू झालं आहे. दर सोमवारी या सीरिजचा एक भाग प्रदर्शित होणार आहे. याच सीरिजसाठी मनोरंजनविश्वातली सगळीच दिग्गज मंडळी उत्सुक आहेत. त्यापैकीच जान्हवी आणि सारा यांचा हा प्रमोशनल व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
सारा अली खान म्हणते “मी या नवीन वेबसीरिजसाठी खूपच उत्सुक आहे. ड्रॅगनचं विश्व आणि तो थरार मला प्रचंड आवडतो. या सीरिजची सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे तुम्ही ही सीरिज बघण्याआधी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ बघायलाच हवी असं काही नाही. जॉर्ज आरआर मार्टिन हे खरंच उत्कृष्ट लेखक आहेत. आणि हा शो पाहण्यासाठी मला अगदी योग्य जोडीदार मिळाला आहे. हिच्यासोबत मी याआधी ‘कॉफी विथ करण’चा काऊच शेअर केला आहे. त्यामुळे आता या सिरिजमध्ये सिंहासनासाठीच्या लढाईत कोण जिंकतंय हे जान्हवीबरोबर बघण्यासाठी मी उत्सुक आहे.”
जान्हवीने देखील या वेबसीरिजबद्दल तीचे मत मांडले आहे. ती म्हणते, “जेव्हापासून ‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रदर्शित झाली आहे तेव्हापासूनच मी या सिरीजची फॅन झाले आहे. मला या सिरिजमध्ये काय दाखवलं जाणार आहे याची थोडीफार कल्पना आहे. पण साराबरोबर ड्रॅगनच्या विश्वाची ही सफर माझ्यासाठी फारच रोमांचक ठरणार आहे. ही सीरिज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अमेरिका आणि भारतात एकाच वेळी प्रसारित होणार आहे त्यामुळे मी यासाठी खूपच उत्सुक आहे.”
आणखीन वाचा : ‘गेम ऑफ थ्रोन्स’इतकीच लोकप्रियता ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’ला मिळणार का? उद्या मिळणार GOT फॅन्सना उत्तर
‘हाऊस ऑफ ड्रॅगन’मध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधल्या कहाणीच्या २०० वर्षं आधी घडलेल्या घटनांना दाखवण्यात येणार आहे. १० एपिसोडची ही सीरिज सोमवारपासून चाहत्यांना दर सोमवारी बघता येणार आहे. यामध्ये हाऊस ऑफ टार्गेरीयनचा इतिहास दाखवला जाणार आहे!