कर्करोगावर उपचार घेण्यासाठी काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे भारतात आली आहे. बॉलिवूडपासून लांब गेलेली ही अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. मुळात याच माध्यमातून तिने आपल्याला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याची माहिती सर्वांना दिली होती. भारतात परतल्यानंतर सोनालीने कॅन्सरचं निदान ते तिच्यावर करण्यात आलेल्या सर्जरीपर्यंतच्या प्रवासाचे अनुभव शेअर केले होते. त्यानंतर तिने एक फोटोशूट करुन आपल्या सर्जरीची जखम दाखविली आहे.
कॅन्सरसारख्या आजाराला मोठ्या धैर्याने सामोरं जाणाऱ्या सोनालीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आली आहे. सोनालीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ऑपरेशनच्या खूणा दाखविल्या आहेत. कॅन्सरवर उपचार सुरु असताना सोनालीवर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांचं व्रण अजूनही तिच्या शरीरावर असून शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने शस्त्रक्रियेमुळे निर्माण झालेला २० इंचाचा कट दाखविला आहे.
सोनालीला या काळामध्ये केवळ सर्जरीच करावी लागली नाही तर या सर्जरीसोबत तिला तिचे लांबसडक केसही कापावे लागले होते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये तिने केस कापण्यावेळेची भावनाही व्यक्त केली आहे.
“सर्जरीमुळे मला काही गोष्टी गमवाव्या लागल्या. मात्र मला त्याचं दु:ख नाही. मी या आजारातून सुखरूप बाहेर पडले हेच माझ्यासाठी खूप आहे. मला लांबसडक केस आवडायचे ते आता कापून छोटे करावे लागले आहेत. मात्र हे लहान केससुद्धा मला आवडतात. मुळात मला विग घालणं किंवा स्कार्फ, टोपीचा आधार घेणं हे अजिबात आवडत नाही”, असं सोनालीने यावेळी सांगितलं.
दरम्यान, सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याची माहिती सर्वांना दिली होती. विशेष म्हणजे सोनालीने अनेक वेळा सोशल मीडियावर सकारात्मक पोस्ट केल्या. तिच्या या पोस्टमुळे अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांना प्रेरणा मिळाल्याचं दिसून आलं आहे.