गणेशोत्सव हा सण नेहमीच अनेकांसाठी विविध कारणांनी महत्त्वाचा असतो. कोणाला गणरायाच्या रुपात या दिवसांमध्ये जणू एक मित्र भेटतो, तर कोणासाठी हाच बाप्पा मार्गदर्शक ठरतो. आपल्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्यानंतर सर्वांच्याच चेहऱ्यावरुन ओसंडून वाहणारा आनंदही काही लपून राहत नाही. अभिनेत्री सोनाली बेंद्रेही सध्या याच आनंदी वातावरणात सहभागी झाली आहे. पण, तरीही तिला एका गोष्टीची उणिव मात्र जाणवत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनालीने यासंदर्भातील एक पोस्टही केली आहे.

सोशल मीडियावर अनेकजण आपल्या गणपतीं बाप्पांचे फोटो पोस्ट करत असतानाच सोनालीही यात मागे राहिलेली नाही. कॅन्सरवरील उपचारांसाठी परदेशात असणाऱ्या सोनालीने तिच्या घरी म्हणजेच भारतात पार पडलेल्या गणपती बाप्पाच्या पूजेचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘गणेश चतुर्थी हा माझ्या हृदयाच्या अतिशय जवळचा सण आहे. आज मला घरी साजरा होणाऱ्या या आनंदोत्सवाची फारच आठवण येत आहे. तुम्हा सर्वांना या सणाच्या खूप खूप शुभेच्छा.’ सर्वांवर बाप्पाची कृपादृष्टी सदैव राहो, असंही ती या पोस्टच्या माध्यमातून म्हणाली आहे.

वाचा : बाप्पा मोरया : आम्ही चालवू हा पुढे वारसा…..

सोनालीच्या या पोस्टमध्ये तिचा मुलगा गणरायाची पूजा करताना दिसत आहे. सोनालीच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची विलोभनीय मूर्तीही अनेकांच्या डोळ्यांचं पारणं फेडत आहे. तेव्हा आता या बाप्पानेच सोनालीला आजाराशी झुंज देण्यासाठी ताकद द्यावी आणि तिला लवकरात लवकर बरं करावं अशीच कामना चाहत्यांनी केली आहे.

Story img Loader