प्रेक्षकांचं हक्काचं मनोरंजनाच साधन म्हणजे छोटा पडदा, आज जरी ओटीटीमाध्यमाकडे प्रेक्षक वळला असला तरी छोट्या पडद्यावरील मालिकादेखील तो नित्यनियमाने पाहत असतो. कौटुंबिक मालिकांच्याबरोबरीने छोट्या पडद्यावर आणखीन एक कार्यक्रम आवर्जून बघितला जातो तो म्हणजे रिअॅलिटी शो. गेल्या दशकभरात छोट्या पडद्यावर अनेक रिअॅलिटी शो होऊन गेले आहेत. आजही ते सुरु आहेत. अनेकदा या कार्यक्रमात दाखवल्या जाणाऱ्या प्रकारावर टीका केली जाते. यावरच अभिनेत्री सोनाली बेंद्रेने भाष्य केलं आहे.
‘दिलजले’, ‘सरफरोश’, ‘मेजर साब’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारून लाखो प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. तिचे चाहते देशातच नाही तर परदेशातही आहेत. सोनाली सध्या ‘इंडिया बेस्ट डांसर ३’ मध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. या निमित्ताने तिने इटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. तिला विचारण्यात आले की रिअॅलिटी शोमध्ये अनेकवेळा भरपूर ड्रामा घातला जातो त्यावर तुझी काय प्रतिक्रिया? सोनालीने उत्तर दिले, मी आतापर्यंत जे शोज केले आहेत. मला कधीच वाईट अथवा नाटकी वागण्यास सांगितले नाही. नृत्य ही एक भावना आहे आणि मी ते पाहण्यासाठी आले आहे.
कपिल शर्माला शोमध्ये ‘हा’ शब्द वापरण्यास मनाई; चॅनलने घातली बंदी, कारण…
ती पुढे म्हणाली, हे स्पर्धक कुठून येतात ते पहा! ते आणि त्यांचे पालक ज्या संघर्षातून जात आहेत ते पहा. हा मंच त्यांना अक्षरशः लक्ष वेधून घेण्याची संधी देत आहे आणि इथूनच त्यांना अधिक कामाच्या संधी मिळतात. शोमध्ये आल्यानंतर केवळ त्यांचेच आयुष्य बदलत नाही तर ते जिथून आलेत त्या वस्त्या, चाळी, जिल्हे, जिल्ह्य़ातील लोकांचे आयुष्यही बदलते. प्रत्येकाचे आयुष्य बदलते. हा भारत आहे. अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.
सोनालीने ओटीटी माध्यमामध्येदेखील पाऊल ठेवले आहे. ‘ब्रोकन न्यूज’ या वेबसीरिजमध्ये तिने काम केले होते. आता याच वेबसीरिजचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.