रेश्मा राईकवार
चकचकीत वेष्टनातून दिलेला पदार्थ उत्तम चवीचाच असायला हवा असं नाही. त्याचं आकर्षक रूप, ब्रॅण्डची महती या बळावर सर्वसाधारण असलेली गोष्टही उत्तम प्रतीची असल्याचे भासवत लोकांना आवडेलच इतक्या विश्वासाने प्रसिद्ध करता येते. बॉलीवूडमध्ये कायम चकचकीत, भव्यदिव्य निर्मिती आणि नावाजलेले कलाकार अशा सगळय़ा गोष्टींचा मुलामा देत आजच्या काळानुसार हुशारीने गोष्ट सांगण्यात निर्माता – दिग्दर्शक म्हणून करण जोहर पटाईत आहे. एकवेळ निर्माता म्हणून त्याने चित्रपटातील व्यक्तिरेखा, त्यांची आर्थिक-वैचारिक पार्श्वभूमी याबाबतीत काही प्रयोग केले असतील. मात्र दिग्दर्शक म्हणून एखादी गोष्ट सांगताना तो ज्या वातावरणात लहानाचा मोठा झाला आहे त्याच श्रीमंत-मोठमोठाल्या हवेल्यांमधून राहणाऱ्या, पारंपरिक नीतीनियमांचा पगडा असलेल्या दोन्ही पिढय़ांतील व्यक्तिरेखा आपल्याला करण जोहरच्या चित्रपटात दिसतात. ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटातही जोहर स्टाइल चकचकीत वातावरण-व्यक्तिरेखा आहेत, मात्र या गोष्टीत आधुनिक विचारांमुळे या पारंपरिक कुटुंबसंस्थेत उडालेला गोंधळ आणि परिस्थितीमुळे का होईना बदलत चाललेली विचारसरणी याला किमान स्पर्श दिग्दर्शकाने केला आहे.
एका पिढीची अधुरी राहिलेली प्रेमकथा पूर्ण करण्याच्या निमित्ताने एकत्र आलेले रॉकी रंधावा (रणवीर सिंग) आणि रानी चॅटर्जी (आलिया भट्ट) दोघंही पाहताक्षणी एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र या दोघांच्या स्वभावात आणि त्यांच्या संस्कृतीत प्रचंड तफावत आहे. दिल्लीतील करोल बागमधला धनलक्ष्मी स्वीट्स या मोठय़ा मिठाईच्या कंपनीचा वारसदार असलेला रॉकी एकूणच मस्त कलंदर स्वभावाचा आहे. त्याच्या घरातली सगळी सूत्रं त्याच्या आजीच्या हातात आहेत आणि त्यामुळे घरात अमूक करायचं नाही, तमूक करायचं नाही अशा नियमांचा सुळसुळाट आहे. अर्थात, घरात नियम आणि घराबाहेर मुक्तपणे वावरणाऱ्या रॉकीला रानीचा एकूणच आत्मविश्वासपूर्ण वावर, स्पष्ट विचार आकर्षित करतात. तर स्वंतत्र विचारसरणीच्या बंगाली कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या उच्चशिक्षित रानीला रॉकीचा मस्तमौला स्वभाव, आकर्षक शरीरयष्टी आणि त्याच्यातला निरागसपणा भावतो. आजी आणि आजोबांना एकत्र आणण्याच्या नादात हे दोघेही अधिक जवळ येतात, पण.. हा विचार लग्नापर्यंत पोहोचवणं रानीला अवघड वाटतं आणि मग खऱ्या अर्थाने हे मधलं वैचारिक अंतर पुसून दोन्हीकडच्यांना एकत्र आणण्याचा त्या दोघांचा खटाटोप सुरू होतो. ढोबळमानाने या चित्रपटाची कथा ‘टु स्टेट्स’ चित्रपटाच्या कथेशी साधम्र्य असणारी आहे. दोन्हीकडे एकमेकांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांना आपलंसं करणं हा समान धागा आहे. आणि तरीही इथे दिग्दर्शकाच्या खुर्चीत करण जोहर असल्याने त्याच्या परिचित अशा भव्य-दिव्य शैलीत गोष्टी घडताना पाहायला मिळतात. इथे प्रेमकहाणी हे केंद्र असली तरी कुटुंबसंस्था, त्यांचे विचार, नीतिमूल्यांची जपणूक या सगळय़ा घटकांचा दोन स्वतंत्र संस्कृतींच्या माध्यमातून विचार केलेला दिसतो. रॉकीचे कुटुंब हे तद्दन पारंपरिक विचारसरणीचे आहे. स्त्रियांनी पदर डोक्यावर ठेवून वावरलं पाहिजे, नवरा – संसार यापलीकडे स्त्रीला जग नसतं असे सगळे नियम जपणाऱ्या या घराची सत्ता एका अशा हट्टी स्त्रीच्या हातात आहे जिने स्वत: कधी नवऱ्याचं आपल्या आयुष्यातील स्थान फारसं महत्त्वाचं मानलेलं नाही. हा विरोधाभास एकीकडे आहे, तर दुसरीकडे रानीची आई उच्चशिक्षित, स्पष्ट विचार असलेली आहे. तिचे वडील कथ्थक नृत्यशिक्षक आहेत आणि आजी हळव्या स्वभावाची.. सगळय़ांशी जुळवून घेणारी-इतरांना समजून घेऊ शकणारी अशी आहे. दोन ध्रुवावरची ही माणसं एकत्रित येतात तेव्हा नात्यांतले धमाके अपेक्षित असतात. मात्र त्यापलीकडे जात काही गोष्टी करण जोहरने यात मांडल्या आहेत.
त्या नवीन नसल्या तरी बॉलीवूडमध्ये ज्या निर्मितीसंस्थांचे चित्रपट मोठे मानले जातात, अशा चित्रपटांमध्ये त्या गोष्टी ठळकपणे जाणवतात. रानीच्या घरातील व्यक्तिरेखांची मांडणी फार विचारपूर्वक करण्यात आली आहे. एकमेकांच्या मतांचा आदर, तथाकथित बुध्दिजीवी सुसंस्कृत वर्गात त्यांचा वावर असला तरी रानीच्या वडिलांना कथ्थक नर्तक म्हणून फारशी मान्यता मिळालेली नाही. मग रॉकीच्या निव्वळ श्रीमंती मिरवणाऱ्या बुरसटलेल्या परंपरांना धरून असलेल्या कुटुंबाकडून त्यांची थट्टा अपेक्षित असली तरी याच सुसंस्कृत लोकांकडून आपलं शिक्षण चांगलं झालं नसल्याने होणारी थट्टाही तितकीच चुकीची आहे या विरोधाभासावर दिग्दर्शकाने बोट ठेवलं आहे. रानीची आई आणि रॉकीमधला अंतर्वस्त्रांच्या दुकानात घडलेला संवाद, रॉकी आणि रानीच्या वडिलांचे एकत्रित कथ्थक नृत्य, प्रेमाला वय नसतं हे सहज समजावून देत एकमेकांना नजरेतूनच समजून घेणारे जामिनी आणि बडे पापा, अगदी धनलक्ष्मीच्या जाहिरातीच्या मांडणीतला बदल अशा काही प्रसंगांची मांडणी भडक असली तरी ती आजच्या काळातील अनेक मुद्दे उपस्थित करते. एकाच चित्रपटात प्रेमकथा, गाणी-नृत्य यांची भरमार (प्रीतमचं संगीत असल्याने गाणी जमून आली असली तरी.. ), इतक्या सगळय़ा व्यक्तिरेखा, त्यांच्या उपकथा आणि पु्न्हा स्त्री सक्षमीकरण, लिंग भेदभाव, समान न्यायाची वागणूक, स्वत:साठी स्वत: उभं राहणं अशा कित्येक संदेशांची पेरणी यामुळे चित्रपट तितकाच लांबलचक झाला आहे. यात आलिया आणि रणवीर यांच्याबरोबरीने सगळय़ा मुख्य भूमिकेतील कलाकारांचा अभिनय महत्त्वाचा ठरला आहे. क्षिती जोग, आमीर बशीर, तोता रॉय चौधरी, चुर्नी गांगुली या नेहमीपेक्षा वेगळय़ा चेहऱ्यांनी आपल्या सहज अभिनयाने या व्यक्तिरेखा उत्तम वठवल्या आहेत. शबाना आझमी आणि धर्मेद्र या जेष्ठ कलाकारांची बातच वेगळी.. जया बच्चन यांना खरंतर चित्रपटात खूप महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या व्यक्तिरेखेला नकारी छटा का आहे याचं वर्णन चित्रपटाच्या सुरुवातीला ओघाओघात येतं, तरीही त्यांच्या व्यक्तिरेखेला पुरेसा न्याय मिळालेला नाही. रणवीर सिंग अशा रावडी आणि हळव्या दोन्ही गोष्टींचा संगम असलेल्या व्यक्तिरेखांमध्ये नेहमी चपखल बसतो, त्याने इथेही त्याचं काम चोख बजावलं आहे. त्या तुलनेत आलिया भट्टची रानी सोपी आणि कमीतकमी गुंतागुंत असलेली आहे. एकूणच तीन तासांचा हा लांबलचक कौटुंबिक भावनिक नाटय़ असलेला प्रयोग मनोरंजक आहे, काही भागात तो आपल्याला नवल वाटायला लावतो. मात्र काहीही असले तरी हा करण जोहर स्टाइल चित्रपट आहे याचा प्रेक्षकांना विसर पडू नये याची पुरेपूर काळजी चित्रपटात घेण्यात आली आहे.
रॉकी और रानी की प्रेमकहानी
दिग्दर्शक – करण जोहर कलाकार – रणवीर सिंग, आलिया भट्ट, जया बच्चन, शबाना आझमी, धर्मेद्र, क्षिती जोग, आमीर बशीर, तोता रॉय चौधरी, चुर्नी गांगुली.