‘कसे आहात मंडळी, हसनाय ना, हसायलाच पाहिजे’ असं म्हणत गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या लोकप्रिय कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रासह राजकारणातील दिग्गज मंडळी येत असतात. आता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात ‘बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल’ हजेरी लावणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया यांची जोडी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. नुकतंच याचा एक व्हिडीओ झी मराठीने शेअर केला आहे.
झी मराठीने युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडीओत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील विनोदवीर रितेश देशमुखच्या लय भारी या चित्रपटातील काही सीन रिक्रेट करताना दिसत आहे. मात्र ते सीन क्रिएट करण्याची त्यांची विनोदी पद्धत पाहून रितेश आणि जिनिलिया हे दोघेही खळखळून हसताना दिसत आहेत. विशेष म्हणजे लय भारी चित्रपटातील अनेक सीन्स या विनोदवीरांनी दाखवले आहेत. तर लय भारी चित्रपटातील आला होळीचा सण लय भारी हे गाणेही फार विनोदी पद्धतीने चित्रित केले आहे. जवळपास ९ मिनिटांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
तर दुसरीकडे झी मराठीने इन्स्टाग्रामवर याबाबतचा एक फोटो शेअर केला आहेत. यात रितेश, जिनिलिया आणि निलेश साबळे हे दिसत आहे. “लई भारी जोडी …! ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये ..! पहा या सोमवार ते बुधवार आपल्या थुकरटवाडीत रितेश देशमुख आणि जेनिलिया वहिनी यांची मराठमोळी धमाल…!”चला हवा येऊ द्या,” असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. दरम्यान रितेश आणि जिनिलिया या कार्यक्रमात येण्यामागचे नेमकं कारण काय आहे? हे अद्याप समोर आले नाही.
झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. या शोमध्ये निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे आणि कुशल बद्रिके यांची धमाल पाहायला मिळत असते.