अभिनेता रितेश देशमुख व जिनिलीया या मराठमोळ्या जोडीचा नुकताच ‘वेड’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. या जोडीचा पहिलाच मराठी चित्रपट, प्रेक्षकांनीदेखील चित्रपट डोक्यावर घेतला. रितेश-जिनिलीया चित्रपटाप्रमाणे त्यांचे खासगी आयुष्यदेखील कायम चर्चेत असते. आज ते दोन मुलांचे पालक आहेत. त्यांची मुलं कायमच माध्यमांसमोर आल्यावर फोटोग्राफर्सना बघून हात जोडताना दिसतात. नुकताच त्यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रितेश-जिनिलीया अनेकदात्यांच्या मुलांबरोबर विविध ठिकाणी एकत्र हजेरी लावताना दिसतात. नुकताच या चौकोनी कुटुंबाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ते विमानतळावर दिसत आहेत. फोटोग्राफर्स दिसताच त्यांच्या मुलांनी हात जोडले आहेत. त्यानंतर आई वडिलांनीदेखील हात जोडले. जिनिलीयाने फोटोग्राफर्सचे आभार मानत त्यांना धन्यवाद म्हणाली. नेटकऱ्यांनी याचं कौतुक केलं आहे.
एकाने लिहले आहे, “बॉलिवूडमधील टॉपची जोडी आहे.” तर दुसऱ्याने लिहिलं आहे, “खूप सुंदर जोडी” अशा प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत. दरवेळी त्यांची दोन्ही मुलं फोटोग्राफर्सना बघून हात जोडताना दिसतात ते असं का करतात यावर रितेशने खुलासा केला होता. तो असं म्हणाला, “एकदा मला माझ्या मुलांनी विचारलं, “ते तुमचे फोटो का काढतात?” त्यावर मी त्यांना म्हणालो की, “तुमचे आई-बाबा जे काम करतात त्यासाठी ते येऊन आमचे फोटो काढतात. तुम्ही आमची मुलं आहात आणि त्यामुळे तुमचेही फोटो काढले जातात. म्हणून तुम्ही फक्त हात जोडून त्यांचे आभार मानायचे. आत्तापर्यंत तुम्ही असं काहीही मिळवलेलं नाही की ज्यामुळे तुमचे फोटो काढले जावेत. तरीही ते येऊन तुमचे फोटो काढतात त्याबद्दल तुम्ही त्यांना हात जोडून धन्यवाद म्हणायचं.” माझं हे म्हणणं त्यांना पटलं आणि ते म्हणाले की, “हो बाबा आम्ही त्यांचे हात जोडून आभार मानू” आणि तेव्हापासून ते फोटोग्राफर्स आणि मीडियासमोर आल्यावर सर्वांना हात जोडून नमस्कार करतात.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती.
दरम्यान त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे. तसेच या चित्रपटातून अभिनेत्री जिनिलीया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण केलं आहे. अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत.