बॉलिवूडच्या झगमगाटात पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेली श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून अनेकदा चर्चेत आली आहे. इशान खत्तरसोबत ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून, ‘सैराट’च्या हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’ या चित्रपटातून हे दोघं झळकणार आहेत. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून, जान्हवीच्या चाहत्यांचा आकडा आतापासूनच वाढत असल्याचे लक्षात आले आहे. पण, सध्यातरी जान्हवी चाहत्यांपासून चार हात दूर राहण्यास प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळते आहे.

‘डेक्कन क्रॉनिकल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जान्हवी आणि इशान एका रेस्तरॉमध्ये गेले असता तिथे काही चाहत्यांनी लगेचच तिला ओळखले. त्यापैकीच एकाने तिच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छाही व्यक्त केली. हे सर्व जान्हवीसाठी नवीनच होते. स्टार किड म्हणून आपल्याविषयी होणाऱ्या चर्चांचा तिला अंदाज असावा. पण, लोक आता आपल्यालाही ओळखू लागले आहेत, आणि सोबतच अशा प्रकारे कोणीतरी सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे पाहून जान्हवीही काहीशी गोंधळली. त्या चाहत्यासोबत सेल्फी काढायचा की नाही, याच पेचात ती पडली अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. त्यावेळी इशानही तिथे होता पण, तो लगेचच कारच्या दिशेने निघून गेला.

वाचा : ‘भन्साळींइतकी सहनशीलता माझ्यात नाही’

इशानच्या मागोमाग सेल्फी काढण्यासाठी विचारणा करणाऱ्या चाहत्यांकडे दुर्लक्ष करत जान्हवीही त्या ठिकाणहून निघाली. तिच्या अशा वागण्याने चाहत्याची निराशा झाली असणार यात शंका नाही. पण, चाहत्यांची गर्दी, माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चा, एक अभिनेत्री म्हणून मिळणारी लोकप्रियता या सर्व गोष्टी जान्हवीसाठी अगदी नवीन असल्याचे नाकारता येत नाही.

Story img Loader