रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना असून लवकरच हा महिना सुरु होणार आहे. त्यातच लॉकडाउन असल्यामुळे ३ मे पर्यंत देशात सारं काही बंद आहे. त्यामुळे यंदा या रमजानच्या महिन्यात मुस्लीम बांधवांना एकत्र येऊन नमाज पठण करणं अवघड असल्याचं दिसून येत आहे. याविषयी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विट करत मुस्लीम बांधवांना एक सल्ला दिला आहे.

अनुभव सिन्हा यांनी रमाजनविषयी केलेल्या ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ”रमजानचा महिना लवकरच सुरु होतोय भावांनो. या वर्षी सेहरी,इफ्तार हे सारं घरीच राहून करुया. नमाज पठणदेखील घरी राहूनच करा. या महिन्यात आपल्या इच्छांना मर्यादित ठेवायचंय. क्या बोलती पब्लिक? ; चला रमजानच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा”, असं ट्विट अनुभव सिन्हा यांनी केलं आहे.

दरम्यान, अनुभव सिन्हा ट्विटरवर सक्रीय असून समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ते व्यक्त होत असतात. मध्यंतरी त्यांनी बऱ्याच ट्विटमधून लॉकडाउनविषयी त्यांची मतं उघडपणे मांडली आहेत. त्यातच त्यांनी आता रमजानविषयी केलेल्या ट्विटमुळे अनेकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं आहे.