गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत चर्चेत असलेल्या, दाक्षिणात्य अभिनेत्याचे मराठी सिनेमासाठी पहिले-वहिले दिग्दर्शन असलेल्या “ठण ठण गोपाळ” सिनेमाला बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनीही पसंतीची पावती दिली आहे. नुकत्याच एका स्पेशल स्क्रीनिग दरम्यान त्यांनी या सिनेमाला पसंतीची पावती दिली.
कार्तिकचा जरी हा दिग्दर्शक म्हणून पहिला प्रयत्न असला तरी सुद्धा त्यांने हा सिनेमा उत्तमरित्या दिग्दर्शित केला आहे. सर्वच कलाकारांचा अभिनयही उत्तम झाला आहे. कोणत्याही कलाकारासाठी आंधळ्याची व्यक्तिरेखा साकारणे हे खूप कठीण असते. परंतु बालकलाकार विवेक चाबुकस्वार याने साकारलेली गोपाळची भूमिका मला खरच खूप भावली आहे. सिनेमाची पहिली फ्रेम पाहिल्यावरच हा सिनेमा उत्तम असणार याचा मला अंदाज आला होता आणि माझा हा अंदाज खरा ठरला याचा मला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी दिली
मुंबईत जन्म झालेल्या कार्तिक शेट्टी याने डिजिटल फिल्म अकॅडेमी येथून फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतले असून हिंदी, कन्नड भाषिक नाटकांमध्ये त्याने आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. सिनेमाची मुख्य संकल्पना माझा जवळचा मित्र समीर भोसले याची आहे. अनेक दिवसांपासून दक्षिणेत प्रतीक्षेत असलेल्या “अक्षते” या कन्नड सिनेमाच्या शुटींग दरम्यान “ठण ठण गोपाळ” या सिनेमाची कथा मी माझ्या सहकाऱ्यांना ऐकवली आणि त्यांना ही ती खूप आवडली. आमचे दाक्षिणात्य सिनेमे हे बहुतांशी मसाला आणि अॅक्शनपट असतात तर मराठीत उत्तम कथानक हे प्रेक्षकांना भावतात त्यामुळे मी हा सिनेमा मराठीत करण्याचे ठरविले. स्वतः फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतले असल्याने तसेच आजवर केलेल्या कामांचा अनुभव पाठीशी असल्याने मी हा सिनेमा स्वतःच दिग्दर्शित करण्याचे ठरविले असे दिग्दर्शक कार्तिक शेट्टी याने सांगितले.
“ठण ठण गोपाळ” सिनेमाची कथा ही दृष्टी नसलेल्या परंतु मनाने जिद्दी असलेल्या एका अकरा वर्षाच्या मुलाची आहे. या मुलाची एका वारली चित्रकाराशी मैत्री होते आणि पुढे त्याच्या आयुष्याला जी एक कलाटणी मिळते त्याभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे. “ठण ठण गोपाळ” सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी, मिलिंद गवळी, बालकलाकार विवेक चाबुकस्वार आणि जर्मन अभिनेत्री सुझेन बर्नेट या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमात एकूण दोन गाणी असून ही गाणी सुप्रसिद्ध गायक उदित नारायण आणि शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत. “ठण ठण गोपाळ” सिनेमा येत्या ३० ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader