भारतीय आणि खासकरून हिंदी चित्रपटांची अवस्था सध्या प्रचंडबिकट आहे. २ चित्रपट सोडले तर इतर कोणत्याही हिंदी चित्रपटाला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. बड्याबड्या स्टार्सचे चित्रपट आपटले असून छोटे चित्रपट रग्गड कमाई करत आहेत. यामागे बॉयकॉट ट्रेंड हा काही प्रमाणात कारणीभूत असला तरी एकूणच चित्रपटांचा घसरलेला दर्जा हेदेखील त्यामागचं महत्वाचं कारण आहे. याच विषयावर लोकप्रिय दिग्दर्शक राकेश रोशन यांनी त्यांचं मत मांडलं आहे.
एकाहून एक सरस चित्रपट देणारे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी नुकत्याच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सध्याच्या बॉलिवूडच्या परिस्थितिबद्दल भाष्य केलं आहे. ते म्हणतात, “दाक्षिणात्य चित्रपट आणि त्यांच्या कथा या अजूनही त्यांच्या मुळांना धरून आहेत. याबरोबरच त्यांना आर्थिक गणितसुद्धा अचूक समजलं आहे. ‘बाहुबली’ हा चित्रपट बऱ्यापैकी ‘करण-अर्जुन’ सारखाच आहे, पण तो खूप भव्य पद्धतीने आपल्यासमोर सादर केला आहे, त्यातली गाणीसुद्धा तशीच सादर केली आहेत. आपल्या बॉलिवूडच्या फिल्ममेकर्सना काय झालंय खरंच काही कळत नाही. मॉडर्न चित्रपटाच्या नावाखाली ते केवळ एकूण लोकसंख्येच्या १% प्रेक्षकांसाठीच (उच्चवर्गीय लोकांसाठी) चित्रपट बनवत आहे. सगळ्या स्तरातील प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवणं ही त्यांची जवाबदारी आहे. सगळ्यांना पचतील, रुचतील असे विषय निवडूनच चित्रपट बनवला पाहीजे तरच तो जास्तीत जास्त लोकांना आपलासा वाटेल.”
इतकंच नाही तर राकेश रोशन यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होणारया खर्चाबद्दलही त्यांचं मत मांडलं आहे. ते म्हणतात की “जर प्रेक्षकांना तुमच्या चित्रपटाचा ट्रेलर किंवा टीझर पसंत आला नसेल तर त्या चित्रपटासाठी जास्तीचं प्रमोशन करणं टाळलं पाहिजे. त्यामध्ये कलाकारांची वेळ मेहनत आणि निर्मात्याचा पैसा फुकट जातो. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद आला असेल तर निश्चित त्यावर पुढे खर्च करावा अन्यथा प्रमोशनसाठी खर्च करणं आवश्यक नाही.”
आणखी वाचा : Photos : हॉट पँट आणि पांढऱ्या टॉपमधला जान्हवी कपूरचा बोल्ड लूक पाहून चाहते झाले घायाळ
‘करण-अर्जुन’, ‘कोयला’, ‘कहो ना प्यार है’, ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’ असे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक राकेश रोशन सध्या सक्रिय नसले तरी त्यांच्या आणि हृतिकच्या ‘क्रिश ४’ ची चर्चा चांगलीच सुरू आहे. याविषयी विचारलं असता, “मी आत्ता कोणत्याही चित्रपटाशी जोडलेलो नाहीये” असं म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे ‘क्रिश ४’ नेमका कधी प्रेक्षकांसमोर येणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.