काल-परवापर्यंत छोटय़ा पडद्यावरचे कलाकार म्हणजे ‘किस झाड की पत्ती’ अशा पद्धतीने वागणाऱ्या बॉलीवूडच्या निर्माते-दिग्दर्शकांना आता त्यांच्याबद्दल नव्याने काय साक्षात्कार झाला आहे, काही कळायला मार्ग नाही. पण, टीव्हीवर एखादा चेहरा लोकप्रिय होतो आहे हे कळायचा अवकाश त्यांना एका नव्हे तर थेट तीन चित्रपटांच्या ऑफर्स द्यायचा नवा पायंडाच पडत आहे. याआधी ‘बालिका वधू’च्या सिद्धार्थ शुक्लाला करण जोहरकडून तीन चित्रपटांची ऑफर मिळाली. पाठोपाठ कपिल शर्मालाही यशराजकडून ऑफर मिळाली असून या यादीत गुरमित चौधरीची भर पडली आहे.
टीव्हीकडून चित्रपटांमध्ये यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या कलाकारांची यादी तशी चांगली आहे. त्याची सुरुवात करायची झाली तर शाहरूख खानचे नाव पहिल्यांदा येते. शाहरूख, विद्या बालन अशी मोजकी नावे सोडली तर बॉलीवूडमध्ये अपयशी ठरलेल्यांची यादी खूप मोठी आहे. पण, सध्या सुशांतसिंग राजपूत, राम कपूर, आयुषमान खुराणासारख्या छोटय़ा पडद्यावरच्या कलाकारांना जे यश मिळते आहे ते पाहता एकूणच बॉलीवूडजनांच्या मनात पुन्हा टीव्ही कलाकारांसाठी हळवा कोपरा तयार झाला आहे, असे वाटते. सिद्धार्थ शुक्ला आणि कपिलनंतर आता तिसरा क्रमांक लागला आहे तो ‘गीत हुई सबसे परायी’ आणि ‘पुनर्विवाह’सारख्या मालिकांमधून लोकप्रिय झालेला अभिनेता गुरमित चौधरी याचा. गुरमित सध्या कलर्सवर ‘खतरों के खिलाडी’मध्ये स्पर्धक आहे. गुरमितला मुकेश आणि महेश भट्टच्या कॅम्पमध्ये प्रवेश मिळाला आहे. तेही एका चित्रपटापुरता नव्हे तर तीन-तीन चित्रपटांसाठी. भट्ट यांच्या विशेष फिल्म्सने याआधीही करण कुंद्रा, जय भानुशालीसारख्या कलाकारांना आपल्या चित्रपटांतून संधी दिली आहे. पण, गुरमितशी त्यांनी एकदम तीन चित्रपटांचा करार केला आहे. गुरमितबरोबरच आणखी एक टीव्ही कलाकार या तीन चित्रपटांच्या करारासाठी निवडला गेला आहे तो म्हणजे करण वाही. करणला सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या नेतृत्वाखाली यूटीव्ही प्रॉडक्शनकडून तीन चित्रपटांसाठी करारबद्ध करून घेण्यात आले आहे. एकूणच, या तीन चित्रपटांच्या आकडय़ांमागे निर्मात्यांचे काय आडाखे आहेत हे समजायला मार्ग नसला तरी ते सध्या टीव्ही कलाकारांच्या चांगलेच पथ्यावर पडले आहे.
छोटय़ा पडद्यावरच्या कलाकारांसाठी बॉलीवूडच्या पायघडय़ा
काल-परवापर्यंत छोटय़ा पडद्यावरचे कलाकार म्हणजे ‘किस झाड की पत्ती’ अशा पद्धतीने वागणाऱ्या बॉलीवूडच्या निर्माते-दिग्दर्शकांना आता त्यांच्याबद्दल नव्याने काय साक्षात्कार झाला आहे
First published on: 29-04-2014 at 06:21 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood door is open for smal screen actors