दिग्दर्शक मधुर भांडारकर हे चित्रपटसृष्टीतलं एक प्रतिष्ठित नाव आहे. ‘पेज ३’, ‘फॅशन’, ‘कॉर्पोरेट’, ‘ट्रॅफिक सिग्नल’सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून मधुर यांनी गंभीर विषय हाताळले आहेत. नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘बबली बॉऊन्सर’ हा चित्ररपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटीया यामध्ये एका वेगळ्याच भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल.

असे कित्येक हिट चित्रपट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट जोरदार आपटला होता. त्याचा चांगलाच फटका मधुर भांडारकर यांना बसला. त्याचविषयी बॉलिवूड हंगामाशी संवाद साधताना मधुर यांनी खुलासा केला आहे. १९९९ साली ‘त्रीशक्ति’ या चित्रपटातून मधुर यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं. अर्शद वारसी, मिलिंद गुणाजी, शरद सक्सेना हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आणि मधुर यांच्या करियरच्या सुरुवातीलाच फ्लॉपचा ठपका बसला.

याविषयी बोलताना मधुर म्हणतात, “पहिलाच चित्रपट फ्लॉप झाल्यावर मी तेव्हा ट्रेन आणि बसमधून प्रवास करायचो. वर्सोवाला जाण्यासाठी तेव्हा मला दोन बस बदलाव्या लागायच्या. तेव्हा मोबाइल महाग असल्याने तो मला परवडणारा नव्हता. माझ्या खिशात तेव्हा ५०-६० नाणी असायची. मी पीसीओ बूथवर जाऊन तेव्हा निर्मात्यांना फोन करायचो. प्रवास करताना माझ्या खिशातील नाण्यांचा आवाज यायचा. त्यावेळी लोकांना मीच कंडक्टर आहे असं वाटायचं.”

आणखी वाचा : येत्या दिवाळीत अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ प्रेक्षकांच्या भेटीला; लवकरच पाहायला मिळणार चित्रपटाची पहिली झलक

बऱ्याच निर्मात्यांनी मधुर यांची कथा न ऐकताच त्यांना नाही म्हंटलं तर काहींनी त्यांना ताटकळत ठेवलं. एकेदिवशी त्यांचा एक मित्र एका बारमध्ये मधुर यांना बीअर प्यायला घेऊन गेला आणि तिथे मधुर यांना ‘चाँदनी बार’ या चित्रपटाची कल्पना सुचली. तो चित्रपट कमी बजेटमध्ये बनला पण त्याची प्रेक्षक आणि समीक्षकांनी प्रशंसा केली आणि तबूच्या बरोबरीनेच रातोरात मधुर भांडारकर हे नाव लोकांना परिचित झालं.

Story img Loader