संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाचा वाद काही केल्या संपण्याचे नाव घेत नाहीये. सेन्सॉरने काही सुधारणा सुचवत या चित्रपटाचे नाव बदलण्याचाही सल्ला दिला आहे. सध्या चित्रपट वर्तुळातही याच चित्रपटाच्या चर्चा सुरु असून, बरेच निर्माते- दिग्दर्शक भन्साळींविषयी आपले मत मांडत आहेत.

‘गँग्स ऑफ वासेपूर’ फेम दिग्दर्शक अनुराग कश्यपने ‘स्पॉटबॉय ई’ला दिलेल्या मुलाखतीत भन्साळींच्या दिग्दर्शन कौशल्याचं तोंड भरुन कौतुक केलं. ‘बिग बजेट’ चित्रपट साकाणाऱ्या भन्साळींचा हात कोणी धरु शकत नाही, असे म्हणत अशा चित्रपटांमध्ये त्यांचे प्रभुत्व असल्याचे अनुरागने स्पष्ट केले.

‘ठामपणे आपल्या भूमिका, मतं मांडण्याची ताकद भन्साळींमध्ये आहे. एखादा चित्रपट साकारण्याची त्यांची अनोखी पद्धत म्हणजे जादूच जणू. किंबहुना एखाद्या गाण्याचं चित्रीकरण करतानासुद्धा ते जी मेहनत घेतात तसे इतर कोणीही करुच शकत नाही. पण, या साऱ्यामध्ये सहनशीलताही तितकीच महत्त्वाची आहे. जी माझ्याकडे मुळीच नाही. भन्साळी खरेखुरे कलाकार आहेत. काही गोष्टींकडे पाहण्याचा त्यांचा चौकटीबाहेरील दृष्टीकोन पाहता मी त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो’, असे अनुराग म्हणाला.

वाचा : अंडरवर्ल्डच्या दहशतीपुढे सेन्सॉरने गुडघे टेकले, करणी सेनेचा आरोप

यावेळी ‘पद्मावती’ चित्रपटावरुन सुरु असणाऱ्या वादाविषयीसुद्धा त्याने आपले मत मांडले. ‘सध्या ते ज्या परिस्थितीला तोंड देत आहेत, त्यावेळी त्यांच्या मनात नेमकं काय सुरु असेल याचा मला अंदाज आहे’, असं म्हणत त्याने भन्साळींची साथ दिल्याचे पाहायला मिळाले. ‘पिक्चर परफेक्ट’ चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भन्साळींच्या चित्रपटांचे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे. भव्य सेट, रंजक कथानक, त्या कथानकाला न्याय देणारे कलाकार आणि त्याला अफलातून संगीताची जोड या महत्त्वाच्या गोष्टींची सुरेख घडी बसवत भन्साळी प्रेक्षकांसमोर चित्रपटांचा नजराणा सादर करतात. ‘पद्मावती’च्या बाबतीतही ही घडी अगदी नीट बसली खरी. पण, चित्रपटाच्या वाटेत दुसरीच विघ्न आल्याचे पाहायला मिळाले.

VIDEO : केप टाऊनमध्ये अनुष्का फिरण्यात दंग, तर विराटवर चढला भांगड्याचा रंग

Story img Loader