येत्या मे महिन्यात आपली शंभरी पूर्ण करणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीने आपले गारूड केवळ भारतीयांवरच नाही, तर जगभरातील अनेक भाषांच्या, अनेक धर्माच्या आणि अनेक पंथांच्या लोकांवर पसरले आहे. नाटय़ परंपरेतून आलेली मांडणी, गाण्यांची पखरण आणि जगभरात पसरलेले भारतीय यांच्या जोरावर हिंदी चित्रपटांनी कॅनडा, अमेरिका, इंग्लंडपासून ते आफ्रिकेतील नायजेरियासारख्या देशांमध्येही लोकप्रियता मिळवली आहे. मात्र इंडोनेशियापर्यंत पोहोचलेला हिंदी चित्रपट जपानमध्ये मात्र फार मजल मारू शकला नव्हता. ही कमतरता आता यशराज फिल्म्सने दूर केली आहे. जपानमधील सर्वात जुन्या चित्रपट स्टुडियो निक्कात्सुसह यशराज फिल्म्सने करार केला असून या करारानुसार यशराज फिल्म्सचे चित्रपट जपानभर प्रदर्शित होणार आहेत.
विशेष म्हणजे हा करार ताबडतोब अमलात आला असून तिकीटबारीवर जवळपास दोनशे कोटींचा गल्ला जमवणाऱ्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा खेळ ओसाका शहरात ७ मार्च रोजी करण्यात आला. त्यापाठोपाठ ‘जबतक है जान’ हा चित्रपटही जपानमध्ये प्रदर्शित होत आहे. ‘टायगर’च्या भव्य प्रिमीयर शोसाठी दिग्दर्शक कबीर खान हा स्वत: ओसाका येथे उपस्थित होता. यापुढील एखादा चित्रपट जपानमध्ये चित्रित करायची आपली इच्छा असल्याचे कबीर खान याने सांगितले. याबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भारताचे वाणिज्य दूत विकास स्वरूप यांनी याबाबत माहिती दिली. स्वरूप यांच्या पुस्तकावरच ऑस्कर विजेता ‘स्लमडॉग मिलिओनेर’ हा चित्रपट बेतला आहे.