मुंबई : तारांकित कलाकार व तंत्रज्ञांची फौज, भव्यदिव्य नेपथ्य, अद्यायावत यंत्रणा आणि कोट्यवधींचे निर्मितीमूल्य असूनही हिंदी चित्रपटसृष्टीला गेल्या काही वर्षांत अपेक्षित आर्थिक यश साधता आलेले नाही. चित्रपटाच्या विषयांतील एकसुरीपणा आणि धाटणीमुळे प्रेक्षकांची निराशा होऊन त्यांनी चित्रपटगृहांकडे अक्षरश: पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी तिकीट खिडकीवर दमदार कामगिरी करत होती. हिंदी चित्रपटसृष्टीला लागलेली मरगळ झटकण्याचे काम ‘छावा’ या हिंदी चित्रपटाने केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या ‘छावा’ या हिंदी चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून तिकीट खिडकीवर यशस्वी घौडदौड सुरू आहे. ‘छावा’ने प्रदर्शनानंतर आठ दिवसांत संपूर्ण भारतात एकूण २४९.३१ कोटी रुपयांची कमाई केली असून कमाईचा आकडा सातत्याने वाढत आहे. ‘छावा’च्या यशस्वी कामगिरीने बॉलिवूडची नव्या वर्षाची सुरुवात दमदार झाली आहे.
रूपेरी पडद्यावर तारांकित कलाकारांची फौज असतानाही गेल्या काही वर्षांत निम्म्याहून अधिक हिंदी चित्रपटांची तिकीट खिडकीवर आर्थिक घडी विस्कटलेली पाहायला मिळाली. तर काही मोजक्याच चित्रपटांना समाधानकारक कामगिरी करता आली. त्यामुळे काही वर्षांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांचे पुन्हा प्रदर्शन करून कोलमडलेली व्यावसायिक बाजू भक्कम करण्याचा आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. २०२५ या वर्षातही काही हिंदी चित्रपटांचे पुन्हा प्रदर्शन करण्याचा ट्रेंड सुरूच आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पुन्हा प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाने दमदार कामगिरी करीत २२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या भारताच्या पहिल्या हवाई हल्ल्यामागील गोष्ट उलगडणाऱ्या ‘स्काय फोर्स’ या हिंदी चित्रपटाने १०० कोटींहून अधिकची कमाई केली. तर कंगना राणावत हिची मुख्य भूमिका असलेल्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला उत्तरेकडील भागात चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र अपेक्षित आर्थिक यश साधता आले नाही. ‘छावा’ चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीची सकारात्मक सुरूवात झाली आहे, वर्षभरात इतरही हिंदी चित्रपट चांगली कमाई करतील, अशी आशा मनोरंजन वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. पुढील काही महिन्यांत तारांकित कलाकारांची फौज आणि कोट्यवधींचे निर्मितीमूल्य असणारे बहुसंख्य हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सलमान खान याची मुख्य भूमिका असलेला ‘सिकंदर’, अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘जॉली एलएलबी ३’, अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘रेड २’, अक्षय कुमार, संजय दत्त, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर आदी कलाकारांची मुख्य भूमिका असलेला ‘हाऊसफुल ५’, जान्हवी कपूर हिची मुख्य भूमिका असलेला ‘परम सुंदरी’, संजय दत्त, टायगर श्रॉफ, सोनम बाजवा आणि हरनाज कौर संधू हिची मुख्य भूमिका असलेला ‘बागी ४’ आदी विविध हिंदी चित्रपट २०२५ या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
मराठीत ‘फसक्लास दाभाडे’ची कोट्यवधींची कमाई
वैविध्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०२४ हे वर्ष समाधानकारक, तर काहीसे आव्हानात्मकही ठरले होते. त्यानंतर नववर्षाच्या सुरुवातीला २०२५ च्या जानेवारी महिन्यात जवळपास आठ ते दहा मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी मोजक्याच चित्रपटांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि काही चित्रपटांची विशेष चर्चा रंगली. हेमंत ढोमे लिखित व दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आणि तिकीट खिडकीवर यशस्वी कामगिरी करीत मराठी चित्रपटसृष्टीसाठी नववर्षाची सकारात्मक सुरूवात केली.