‘दृश्यम्’ चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात सध्या अजय देवगण व्यग्र आहे. असं प्रथमदर्शनी दिसतं. मात्र, ‘एडीएफ’ (अजय देवगण फिल्म्स)च्या ऑफिसमध्ये शिरल्यावर तिथे सगळं काम शांतपणे सुरू असतं. खुद्द अजय देवगणही तितक्याच शांततेने पण, पटापट आपल्या प्रश्नांची उत्तरं देतो. निशिकांत कामत दिग्दर्शित ‘दृश्यम्’ हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. ज्यात अजयने चौथी पास झालेल्या विजय साळगावकर नामक केबल व्यावसायिकाची भूमिका केली आहे. ‘विजय आणि सिंघममध्ये फारसा फरक नाही. दोघेही तितकेच पराक्रमी आहेत. पण, सिंघम हाताने लढते तर तोच खेळ विजय बुद्धीने खेळतो. इतक्या वर्षांनी मला जबरदस्त पटकथा असलेला चित्रपट करायला मिळाला आहे’, असे अजय सांगतो. पण, ‘दृश्यम्’ची कथा, कलाकार सगळ्याच गोष्टी प्रभावी असल्या तरी सर्वसामान्यपणे विचार करता यात हिरो-हिरॉईनची प्रणयी केमिस्ट्री नाही, गाणी नाहीत. आहे तो एकापाठोपाठ वेगाने घडणाऱ्या घटनांचा खेळ. प्रेक्षक हा चित्रपट पाहतील आणि मग त्यांच्याकडून इतरांपर्यंत जी भावना पोहोचेल तीच या चित्रपटाची प्रसिद्धी असेल, असं अजयला वाटतं. त्यामुळे ‘दृश्यम्’साठी काहीतरी अचाट प्रसिद्धी करावी, असं आपल्याला वाटत नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
अजयने पहिल्यांदाच मराठमोळ्या ‘लय भारी’ दिग्दर्शक निशिकांत कामतबरोबर या चित्रपटात काम केलं आहे. ‘दृश्यम्’चा विषयच संवेदनशील आहे, मनाच्या खेळाशी निगडित असलेला हा चित्रपट तितक्याच संवेदनशीलतेने आणि प्रभावीपणे दिग्दर्शित करण्याची गरज होती. निशिकांत हा माणूस म्हणून तसाच आहे आणि दिग्दर्शक म्हणून त्याची असलेली वेगवान मांडणी, त्याची वेगळी शैली याआधीही अनुभवली असल्याने ‘दृश्यम्’ची धुरा त्याच्यावर सोपवण्यात आली होती, असं अजयने सांगितलं. अजयबरोबर ‘दृश्यम्’च्या गप्पा सुरू असल्या तरी मनाने मात्र तो त्यात फारसा अडकून पडलेला दिसत नाही. एकाचवेळी त्याच्या मनाच्या एका कप्प्यात ‘दृश्यम्’च्या प्रसिद्धी कार्यक्रमांची तयारी असेल तर दुसऱ्या कप्प्यात ‘शिवाय’च्या दिग्दर्शनाची तयारी सुरू असते. तिसरा कप्पा ‘एडीएफ’च्या प्रादेशिक चित्रपटांवर लक्ष ठेवून असतो तर चौथा कप्पा पत्नी काजोल, मुले आणि पाचवा कप्पा..
बॉलिवूडच्या पहिल्या पाचातला नायक म्हणून ज्या अजय देवगणची गणना होते त्याला या सगळ्या गोष्टी कशा जमवता येतात? हा आपल्याला मोठा प्रश्न पडतो. अजय मात्र तितकंच छोटंसं मंदस्मित करतो. ‘माझ्याकडे खूप चांगली टीम आहे’, एवढंच उत्तर देतो. त्याच्याकडे चांगली टीम आहे, हे खरं आहे. त्याचं कारण म्हणजे त्याने चित्रपटांच्या बाबतीत चांगले ज्ञान असणारी माणसं घट्ट धरून ठेवली आहेत. आपल्या चित्रपटात नायिका कोण आहे? याचा तो फारसा विचार करत नाही. पण, दिग्दर्शक कोण आहे, तंत्रज्ञ कसे आहेत या सगळ्यावर मात्र तो जाणीवपूर्वक लक्ष ठेवून असतो. म्हणून, तर गेल्या काही वर्षांत त्याने असिन, तमन्ना, काजल अग्रवाल, श्रिया सरन आणि आगामी ‘शिवाय’ या चित्रपटात सायेशा सैगल, एरिक कार या दोन नवीन अभिनेत्रींबरोबर काम करणार आहे. अमुक एका हिरोची आणि हिरॉईनची केमिस्ट्री असते आणि म्हणून पडद्यावर ती जोडी खुलून दिसते यावर माझा अजिबात विश्वास नाही. केमिस्ट्री ही त्या व्यक्तिरेखांमध्ये असते, असं तो ठासून सांगतो. त्याचं हे ठाम मत पत्नी काजोल आणि सुपरस्टार शाहरुख यांच्या जोडीबद्दलही तितकंच स्पष्ट आहे. त्यामुळे रोहित शेट्टी कितीही चांगला मित्र असला तरी त्याच्या ‘दिलवाले’मध्ये काजोल-शाहरुख ही प्रेक्षकांची आवडती जोडी लोकांसमोर येईल, याचंही त्याला नवल वाटत नाही. आणि खुद्द तो आणि काजोल कित्येक दिवस एका चित्रपटात दिसले नाहीत, याबद्दलही त्याला विशेष काही वाटत नाही. ‘ते सगळं थोतांड आहे’, असं तो म्हणतो. ‘माझ्या आणखी एका चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी कोणीतरी नविन अभिनेत्री शोधतोय असं त्या दिग्दर्शकाने मला कळवलं. त्या चित्रपटाबद्दलचे सगळे अपडेट्स मला माहिती आहेत, पण माझ्याबरोबर कोणती अभिनेत्री आहे हे काही मी विचारलेलं नाही’, असं सांगून तो मोकळा होतो. ‘शिवाय’ हा दिग्दर्शक म्हणून त्याचा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात शिवाय म्हणून त्याचा जो लुक आहे त्या लुकपासून ते त्याची कथा, लोकेशन्स, चित्रीकरण सगळ्याच बाबतीत अजय काटेकोरपणे काम करतो आहे. ‘शिवाय’ची संकल्पना वेगळी आहे त्यामुळे हा चित्रपट भव्य प्रमाणावर चित्रित केला जावा, हे मी निश्चित केलं होतं. त्यानुसार, हा संपूर्ण चित्रपट पहिल्यांदाच सगळ्या बर्फाळ परिसरात चित्रित केला जाणार आहे. गेली दोन वर्षे आम्ही या चित्रपटासाठी तयारी करतो आहे आणि तुम्हाला खोटं वाटेल.. अजूनही त्याच्या नियोजनाचं काम बारिकीने सुरूच आहे, असं तो सांगतो.
या वर्षांच्या सुरुवातीलाच अजयने ‘शिवाय’ची तयारी सुरू केली होती. कॅ नडात युनिट चित्रीकरणासाठी पोहोचलेही. मात्र, चित्रपटासाठी हवं असलेलं वातावरण न मिळाल्याने चित्रपटाची टीम मागे परतली. मधल्या काळात अजयने ‘दृश्यम्’ पूर्ण केला. आता तो पुन्हा ‘शिवाय’कडे वळला आहे. ‘चित्रपटाची लोकेशन्स अवघड ठिकाणी आहेत. बऱ्याचशा ठिकाणी हेलिकॉप्टर्सशिवाय पोहोचता येणंही शक्य नाही. त्यामुळेच सध्या आम्ही जय्यत तयारी करतो आहोत’, असं अजयने सांगितलं. ‘शिवाय’चं चित्रीकरण अवघड आहे, खर्चीक आहे पण, याआधीही आपण अशा अचाट गोष्टी केल्या असल्याने त्याचं दडपण येत नाही, असं तो म्हणतो.
एक कलाकार, निर्माता म्हणून त्याने चांगली माणसं जमवली आहेत. त्यांच्याबरोबर काम करत त्याने आपले बॉलिवूडमधले ‘अजय’ स्थान निर्माण केले आहे. ‘शिवाय’च्या निमित्ताने दिग्दर्शनातही हा देवगण ‘अजय’ ठरेल, अशी आशा करायला हरकत नाही.
* त्याचे तेव्हाचे मोठे केस, मूळचा काळा रंग, पटकन कुठलीही रेषा न उमटणारा त्याचा चेहरा.. सुरुवातीच्या काळात ‘फूल और काँटे’ चित्रपटात तो जेव्हा दोन बाईकवरून प्रवेश करता झाला तेव्हा हा ‘हिरो’? फार तर अॅक्शन चांगला करतो आणि त्याचे वडील वीरू देवगण हिंदीतले प्रसिद्ध फाईट मास्टर, निर्माते आहेत. होईल त्याचं काहीतरी.. असेच आडाखे अजय देवगणविषयी बांधले गेले होते. मात्र, चेहऱ्यावरच्या त्या कमालीच्या थंडपणाला आणि त्याच्या तथाकथित दोषांनाच त्याने आपलं शस्त्र बनवलं. ‘दिलवाले’सारखा तद्दन व्यावसायिक चित्रपट करणाराही तोच, ‘जख्म’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेणाराही तोच आणि ‘गोलमाल’सारख्या चित्रपटांतून विनोदी अभिनेता म्हणून कवतिक मिळवणारा जबरदस्त अॅक्शनवाला बाजीराव ‘सिंघम’ही तोच.. आपल्या या कमालीच्या अभिनय गुणांमुळे खानावळीला टक्कर देत पाचव्या स्थानावर हा ‘अजय’ उभा आहे..
* एकाचवेळी तो मराठी चित्रपटाच्या निर्मितीतही गुंतला आहे. ‘विटीदांडू’ चित्रपटानंतर दुसऱ्या चित्रपटावरही काम सुरू असल्याचे त्याने सांगितले. अर्थातच, मराठी चित्रपटांसाठी आपली सगळी मदार अभिनेता विकास कदमवर अवलंबून असल्याचे त्याने स्पष्ट केले. मराठी चित्रपट, त्यांचे बदलते ट्रेंड्स, इंडस्ट्रीची समीकरणं हे सगळं ज्ञान मला विकासच्या माध्यमातून मिळतं. त्यामुळे ती सगळी जबाबदारी त्याच्यावर असल्याचं अजयने सांगितलं.
* ‘शिवाय’च्या बरोबरीने आणखी एका ‘एडीएफ’च्या चित्रपटाची तयारी सुरू आहे ज्यात काजोलची महत्त्वाची भूमिका असेल, असे त्याने सांगितले. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘दिलवाले’ हा काजोलचा बिग बजेट चित्रपट आहे. तिने नेहमीच मोठय़ा बॅनर्सबरोबर काम केलं आहे. त्यामुळे इतक्या मोठय़ा गॅपनंतर ती पुन्हा बिग बजेट चित्रपटात मोठय़ा कलाकारांबरोबर काम करते आहे, याबद्दल खूप आनंद वाटतोय, असं सांगणाऱ्या अजयने सध्या तरी तो आणि काजोल एकत्र काम करू शकतील, असा चित्रपट शक्य नसल्याचेही स्पष्ट करतो.