‘राजकारण’हा काही जणांच्या आवडीचा तर अनेक जणांच्या नाराजीचा विषय असतो. सर्वसामान्य माणूस राजकारण आणि राजकारण्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. बॉलीवूडमधील काही कलाकारांचा अपवाद वगळता अनेक जण राजकारणापासून लांब राहणेच पसंत करतात. पण असे असले तरी बॉलीवूडच्या काही नायिका आता ‘राजकारणी’होणार आहेत.
बॉलीवूडच्या या नायिका प्रत्यक्षात राजकारणात उतरणार नसून चित्रपटातून त्या राजकीय व्यक्तिरेखा साकार करणार आहेत. एखाद्या कलाकारासाठी वेगवेगळ्या भूमिका करणे हे आव्हान असते. ते आव्हान पेलताना कलाकाराचाही कस लागत असतो. बॉलीवूडमधील सोनम कपूर, मल्लिका शेरावत, कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा यांनी हे आव्हान स्वीकारले आहे.
प्रत्यक्षातील राजकारण आणि राजकारण्यांपासून त्या दूर असल्या तरी काही आगामी चित्रपटांच्या निमित्ताने या अभिनेत्री ‘राजकारणी’ होणार आहेत. पुढील वर्षी या अभिनेत्रींचे जे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, त्यामध्ये या राजकारणी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अनुज चौहान यांच्या ‘बॅटल फॉर बिटोरा’ या पुस्तकावर आधारित एक चित्रपट येत असून त्यात सोनम कपूर राजकारणी भूमिकेत दिसणार आहे. के. सी. बोकाडिया यांच्या ‘डर्टी पॉलिटिक्स’मध्ये मल्लिका शेरावत हिने राजस्थानी महिला राजकारणी रंगविली आहे. मधुर भांडारकरच्या ‘मॅडमजी’ या चित्रपटात प्रियांका चोप्राही वेगळ्या भूमिकेत आहे. ‘आयटम गर्ल ते राजकीय नेतृत्व’असा तिचा प्रवास या चित्रपटात आहे. तर कतरिनाही एका चित्रपटात राजकीय नेत्याची भूमिका करत आहे. बॉलीवूडच्या या अभिनेत्रींना राजकीय नेत्यांच्या भूमिकेत पाहणे, त्यांच्या चाहत्यांसाठीही आगळी संधी असणार आहे.