काही कलाकारांचे चेहरे अवघ्या गाण्याच्या एका ओळीनेही प्रेक्षकांच्या समोर येतात. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सालस भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी ती अभिनेत्री म्हणजे रामेश्वरी. ‘ले तो आए हो हमें सपनों के गांव में’ हे गाणं आठवलं की या अभिनेत्रीचा चेहरा लगेचच सर्वांसमोर येतो. ‘दुल्हन वही पिया मन भाए’ या चित्रपटात रामेश्वरीने साकारलेली भूमिका आजही अनेकांची दाद मिळवते. अशी ही एव्हरग्रीन दुल्हन रंगवणारी अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री होती.
कारकिर्दीच्या एका टप्प्यावर तर रामेश्वरी म्हणजे यशाची दुसरी व्याख्या ठरत होती. ‘आशा’, ‘सीता मां लक्ष्मी’, ‘निजाम’ हे या अभिनेत्रीचे काही गाजलेले चित्रपट. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशा’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेसोबतच त्यांच्या सौंदर्यानेही अनेकांनाच भुरळ पाडली होती. रामेश्वरी यांच्या चित्रपट कारकिर्दीत ‘दुल्हन वही जो पिया मन भाए’ आणि ‘आशा’ हे दोन्ही चित्रपट मैलाचा दगड ठरले होते.
वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट
काळ जसजसा पुढे जात होता तसतसं रामेश्वरी यांचं नावही अनेकांच्या हृदयाचा ठाव घेत होतं. त्यानंतर एका टप्प्यावर त्यांनी चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला आणि त्या टेलिव्हिजन विश्वाकडे वळल्या. विविध भूमिकांना न्याय देणाऱ्या रामेश्वरी सध्या स्वत:चा व्यवसाय सांभाळत आहेत. ‘नीमली नॅच्युरल्स’ या नावाने त्यांनी स्वत:चा एक ब्रॅण्ड सुरु केला आहे. ज्यामध्ये नैसर्गिक तत्वांचा वापर करत त्वचेची काळजी घेणारे आणि अरोमा थेरेपीचे प्रोडक्ट्स बनवले जातात. त्यामुळे अभिनय क्षेत्रातील या अभिनेत्रीची ही दुसरी इनिंग आहे असं म्हणायला हरकत नाही.