चित्रकथी, सौजन्य –
या भूतलावरील प्रत्येक माणसाला स्मरणरंजन हे आवडतेच. किंबहुना स्मरणरंजन हे ती व्यक्ती माणूस असल्याचेच निदर्शक असते. अगदी लहान मुलांपासून ते आजोबांपर्यंत प्रत्येकालाच ते आवडते. अर्थात तरुण मुलांचे स्मरणरंजन हे बालपणाबद्दल, तर मध्यमवयीन व्यक्तीचे स्मरणरंजन प्रामुख्याने नवथर तारुण्याबद्दल असते. वृद्धत्वाकडे झुकताना तर या स्मरणरंजनाच्या विषयांचा एक मोठा साठाच तयार झालेला असतो. हे स्मरणरंजन जसे व्यक्तीसापेक्ष असते तसेच ते विषयसापेक्षही असते. म्हणजे काही विषयच असे असतात की, ते आबालवृद्ध सर्वानाच प्रचंड आवडतात. बहुतांश वेळेस हे विषय दृक् श्राव्य असतात. या दृक्श्राव्य विषयांमध्ये सर्वाधिक बाजी मारून जाते ते चित्रपट माध्यम. चित्रपटांचा जनमनावर असलेला पगडा जबरदस्त आहे आणि भारत हा तर सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती करणारा चित्रपटवेडय़ांचा देश आहे. म्हणूनच तर इथे अमिताभ बच्चनला देवत्व बहाल करून त्याच्या हयातीतच त्याचे मंदिर उभारले जाते आणि त्याच्या मूर्तीवर अभिषेकही केला जातो. अशा या भारतीय चित्रपटसृष्टीने अलीकडेच शतक पूर्ण केले. शतक हे तर स्मरणरंजनासाठीचे मोठेच निमित्त. अनेकांनी आपापल्या पद्धतीने हे स्मरणरंजन करत शतक साजरे केले. वयाने तरुण असलेल्या शैलजा गुप्ताने त्यासाठी अलीकडे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिजिटल माध्यमाचा वापर केला आणि एक वेगळीच कला रसिकांना पाहायला मिळाली.
शैलजा गुप्ताने करिअरची सुरुवात वेब डिझायनर म्हणूनच केली. त्यानंतर माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वत:ची कंपनी सुरू केली. स्वत: चित्रपटही तयार केले, लेखन- दिग्दर्शनही केले. ‘चोखेर बाली’ या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय मार्केटिंगचे काम केले. शाहरूख खानच्या गाजलेल्या ‘रावन’ या चित्रपटासाठी त्यानुरूप टी-शर्ट, खेळणी आदी मर्केंडाइज तयार करण्याचेही काम पाहिले. शाहरूख खानच्याच ‘रेड चिलीज’ या चित्रपट निर्मिती कंपनीची अमेरिकेतील प्रमुख म्हणून ती काम पाहते आहे. तंत्रज्ञानाशी असलेला तिचा संबंध तसा जुनाच. ९९ साली डॉटकॉमची चलती होती. तो तिच्या करिअरचा उमेदीचा काळ होता. त्यावेळेस ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी,’ ‘बिवी नं. वन,’ ‘बादशाह,’ ‘हिंदूुस्थान की कसम,’ ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटांसाठी तिने इंटरनेटवर संकेतस्थळे अर्थात वेबसाइटस् तयार करण्याचे काम केले. शाहरूखशी संबंधित एका वेबसाइटच्या निमित्ताने त्याच्याशी ओळख झाली. मात्र नंतर या कामाचा कंटाळा आल्यावर तिने करिअरमध्ये थोडा विराम घेत काही वेगळे करण्याचा निर्णय घेतला आणि ती कलेकडे वळली. सुरुवात मातीकामापासून केली. पॉटरी, शिल्पकृती, मांडणीशिल्प असे प्रकारही हाताळले. चित्रे चितारली. त्याच वेळेस फीचर फिल्म तयार करण्याचा किडा डोक्यात वळवळू लागला. मग तिने स्वत: फिल्मही केली. करिअरच्या या मार्गावर एक बाब तिच्यासोबत कायम आहे, ती म्हणजे तंत्रज्ञान. याच तंत्रज्ञानाचा वापर तिने आता या नव्या कलेसाठी केला आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त तिने सुमारे दीडशे चित्रे चितारली आहेत. एरवी चित्रांसाठी ब्रशचा वापर केला जातो. मात्र आता तंत्रज्ञानाने साधनांमध्येही बदल झाला आहे. या चित्रांसाठी तिने ‘अॅडोब’ या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपनीच्या फोटोशॉप, इलस्ट्रेटर आदी सॉफ्टवेअर्सचा वापर केला आहे. फोटोशॉपमधील स्केचिंग, जलरंगातील चित्रण, फिल्टर्स वापरून चित्रावर केली जाणारी प्रक्रिया, विशिष्ट प्रकारचे ब्रशचे फटकारे आदींचा वापर तिने या चित्रांमध्ये मुक्तहस्ते केला आहे. या सर्व प्रकाराला आता ‘डिजिटल कला’ असे म्हटले जाते. अर्थात यात उपयोजित बाबीच अधिक असल्याने याला ललित कलेचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. शैलजाने चितारलेली ही डिजिटल चित्रेदेखील ललित कलेच्या दर्जाची नाहीत. मात्र त्यांची एक वेगळी मजा निश्चितच आहे. दृश्य आनंद देणे हाही कलेचा एक महत्त्वाचा उद्देश असतो. दृश्य आनंदाच्या बाबतीत कला ललित की उपयोजित हा भाग महत्त्वाचा नसतो. आपण त्यातील आनंद लुटण्याचे काम करावे. जेव्हा त्यांचा दर्जा ठरविण्याची वेळ येईल, तेव्हा मात्र स्पष्टपणे आपले मत मांडावे. प्रस्तुत चित्रे ही ललित कलेतील चित्रांप्रमाणे नाहीत, ती उपयोजित प्रकारात मोडणारी. मात्र त्यातील काही आनंद देणारी अशी आहेत.
आपल्या चित्रांबद्दल बोलताना शैलजा सांगते, ‘‘अमिताभ बच्चनला पाहात मी मोठी झाले. माझा जमाना होता तो व्हीसीआरचा आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा. त्यामुळे व्हीसीआर भाडय़ाने आणताना प्रत्येकाच्या आवडीचा एकतरी चित्रपट आणला जायचा. त्यामुळे अगदी जुन्या चित्रपटांपासून ते आतापर्यंत सर्व चित्रपट पाहिले. आता तर तो आवाका गुरुदत्तपासून ते रणबीर कपूपर्यंत विस्तारलाय. म्हणूनच चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त या चित्रपटांमधून आपल्याला आनंद देणारे नायक- नायिका त्यांच्या त्या प्रसिद्ध लकबीसह डिजिटली चितारावे, असे वाटले आणि ही मालिका अस्तित्वात आली.
शैलजाने ही सर्व डिजिटल चित्रे http://www.theshailja.com या तिच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केली आहेत. या चित्रांमध्ये डिजिटल प्रक्रियेने रंग भरताना तिने प्रकाशमान भासणाऱ्या अशा नवीन फ्लोरोसंट रंगांचा वापर केला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच चित्रांमध्ये ते ताजे वाटतात. काही चित्रांमध्ये ते एखाद्या निगेटिव्ह फिल्मप्रमाणे भासतात तर काहींमध्ये ते मुद्राचित्राप्रमाणे दिसतात. खासकरून अमिताभ बच्चनचे चित्र हे मुद्राचित्राच्या जवळ जाणारे आहे. याच चित्रामध्ये भविष्यातील एक धोक्याची घंटाही खणखणताना दिसते. ती म्हणजे स्मार्टफोनवर स्टायलस वापरून अशा प्रकारे मुद्राचित्राचा परिणाम साधता येत असेल तर मुद्राचित्र या प्रकाराकडे वळणारे भविष्यात किती असतील? अर्थात केवळ दृश्यपरिणाम साधूून मुद्राचित्राचा पोत प्रत्यक्षात मिळणार नाही. मुद्राचित्राच्या बाबतीत त्याचा पोतही तेवढाच महत्त्वाचा असतो. किंबहुना तो दृश्यपरिणाम हा त्याच्या त्या वैशिष्टय़पूर्ण असा पोत असण्यामुळेच तर प्राप्त होतो. उल्लेख करावीत अशी आणखी दोन चित्रे आहेत ती अशोककुमार आणि जॅकी श्रॉफ यांची. ही दोन्ही निगेटिव्ह फिल्मचा परिणाम साधणारी आहेत. ही चित्रे चितारताना शैलजाने त्या त्या कलावंतांची प्रसिद्ध लकब उचलल्याचे म्हटले आहे. मात्र काही जणांच्या बाबतीत तसे जाणवत नाही. ही सर्व व्यक्तिचित्रणात्मक आहेत. प्रत्यक्षात तिने संकेतस्थळावर गोल्डन, अँग्री, रोमँटिक आणि मॉडर्न इरा असे अनेक भाग केले आहेत. आपण खूप अपेक्षेने ते सारे पाहायला जातो, तेव्हा असे लक्षात येते की, यात अभिनेते आणि अभिनेत्री यांची फक्त व्यक्तिचित्रे आहेत. रोमँटिक इरा या भागामध्ये जोडगोळ्या पाहायला मिळतील, अशी अपेक्षा असते. म्हणजे ते राज कपूर आणि नर्गिसचे पावसातील प्रसिद्ध चित्र किंवा सिलसिलामधील अमिताभ आणि रेखा किंवा मग बर्फीमधील प्रियांका आणि रणबीर कपूर अशी जोडी पाहायला मिळेल, असे वाटते. पण आपली सपशेल निराशा होते. कारण तिने व्यक्तिचित्रांचीच विभागणी गोल्डन, अँग्री, रोमँटिक आणि मॉडर्न या वर्गवारीमध्ये केली आहे.
या चित्रांमध्ये मूळ फोटो घेऊन त्यात केवळ रंग भरण्याचे तेवढेच काम तिने केलेले नाही तर त्यात डिझाइन्सही तिने बेमालूम मिसळल्या आहेत. देव आनंद, दिलीपकुमार यासारख्या चित्रांमध्ये तिने मेहनत घेतलेली दिसते. देव आनंद तर चांगलाच साकारला आहे. तर काही चित्रांमध्ये केवळ रंगकामच केल्याचा अनुभव येतो.
चित्रांमधील व्यक्तिरेखेचा क्षण आणि अँगल या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ती निवड करताना काही चित्रांच्या बाबतीत चूक झाल्याचे लक्षात येते. म्हणजे एखादी लकब ही चित्रपटात चांगली दिसू शकते पण याचा अर्थ ती चित्र म्हणून त्यातही चांगलीच दिसेल असे नाही. मात्र प्रसिद्ध लकब निवडताना तिने लोकप्रियता हा निकष ठेवलेला दिसतो. तसे न करता तिने चित्रासाठी म्हणून वेगळी लकब निवडणे आणि केवळ आणि केवळ चित्र म्हणून त्याचे सारे निकष लावून तशी निवड करणे हे केव्हाही योग्यच ठरले असते. नसिरुद्दीन शहाचा क्षण, अँगल सारे काही नेमके आहे. त्यामुळे त्या चित्राचा परिणाम अधिक चांगला झालेला दिसतो. त्यात रंग मोजकेच आहेत, कमी आहेत आणि तेही उजळ नाहीत. असे असतानाही नेमका क्षण आणि अँगल यामुळे ते चित्र चांगले उतरलेले दिसते. रसिकांना ते अधिक भावू शकते. अनेक त्रुटी या चित्रांमध्ये राहून गेल्याचे किंवा चित्रकर्ती डिजिटल माध्यमाच्या प्रेमात पडून तिने काम केल्याचे दिसते. तरीही या खेपेस चित्रकथीमध्ये त्याची दखल घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नवीन माध्यम समोर येते तेव्हा अशा त्रुटी राहतात. कारण निकष कोणता लावायचे, ते नक्की नसते किंवा मग माध्यमाच्या प्रेमात कलावंत पडलेला असतो. पण नवीन माध्यमाचीही काही बलस्थाने असतात, वेगळा परिणाम असतो तोही अनुभवणे महत्त्वाचे असते आणि त्याहूनही महत्त्वाचे असते ते या प्रयोगांमधून शिकत मोठे होणे!
डिजिटल स्मरणरंजन
या भूतलावरील प्रत्येक माणसाला स्मरणरंजन हे आवडतेच. किंबहुना स्मरणरंजन हे ती व्यक्ती माणूस असल्याचेच निदर्शक असते. अगदी लहान मुलांपासून ते आजोबांपर्यंत प्रत्येकालाच ते आवडते.
Written by badmin2
First published on: 19-07-2013 at 01:26 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodलोकप्रभाLokprabhaहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood in digital art by shailja gupta