बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि आपापल्या चाहत्यांचा खास प्रेक्षकवर्ग निर्माण केलेले ‘खान’दान अर्थात बॉलिवूडचे सुपरस्टार आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान हे तीघेही लवकरच एकत्र येणार आहेत. बॉलिवूडचे हे ‘खान’दान प्रेक्षकांना कोणत्याही चित्रपटाच्या निमित्ताने नव्हे तर छोटय़ा पडद्यावरील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.
तिघाही ‘खान’मंडळींचा प्रेक्षकवर्ग मोठा असून प्रेक्षकांना या तिघानाही एकाच चित्रपटात एकत्र काम करताना बघण्याची नक्कीच उत्सुकता आहे. हे तिघेही एका चित्रपटात मोठय़ा पडद्यावर अद्यापतरी एकत्र आलेले नाहीत. पण छोटय़ा पडद्यावरील सूत्रसंचालक रजत शर्मा यांनी ‘आप की अदालत’ या कार्यक्रमासाठी त्या तिघांना एकत्र आणले आहे.छोटय़ा पडद्यावरील शर्मा यांचा हा कार्यक्रम लोकप्रिय असून विविध क्षेत्रातील सेलिब्रेटी कार्यक्रमात सहभागी होतात. शर्मा यांच्यासह कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रेक्षकानाही त्या सेलिब्रेटीला प्रश्न विचारण्याची संधी मिळते. बॉलिवूडमधील कोणत्याही चित्रपट निर्मात्याला जे जमले नाही ते रजत शर्मा यांनी आपल्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने छोटय़ा पडद्यावर करून दाखवले आहे. तिघांच्याही चाहत्यांसाठी त्यांना एकत्र एकाच कार्यक्रमात पाहणे हा आगळा योग असणार आहे.
सलमान खानची बहीण अर्पीता हिच्या लग्नाच्या निमित्ताने शाहरुख व सलमान एकत्र आले होते. दोघांचे सुर जुळल्यानंतर त्यांनी आमीर खानशी व्हिडिओ चॅट केल्याचेही सांगितले जाते. आमीर खानने अर्पीताच्या लग्नाला हैदराबाद येथे हजेरी लावली होती तर शाहरुख मुंबईत तिच्या रिसेप्शनला उपस्थित होता. त्यामुळे हे तिघेही एकमेकांच्या जवळ आले असल्याची चर्चा आहे.
‘आप की अदालत’ या कार्यक्रमाला २१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने याचा विशेष भाग सादर होणार आहे. या तिघांच्या सहभागाचे चित्रीकरण २ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे प्रगती मैदानावर केले जाणार असल्याचे समजते. कार्यक्रमाच्या चित्रीकरण प्रसंगी रणबीर कपूर, दिपीका पदुकोण, प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा आदी कलाकारही उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.
बॉलिवूडचे ‘खान’दान एकत्र!
बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि आपापल्या चाहत्यांचा खास प्रेक्षकवर्ग निर्माण केलेले ‘खान’दान अर्थात बॉलिवूडचे सुपरस्टार आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान हे तीघेही लवकरच एकत्र येणार आहेत.
First published on: 30-11-2014 at 07:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood khandan come together